Odisha Cabinet reshuffle : ओडिशात मोठी राजकीय घडामोड, बिजू जनता दलाच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा! उद्या नवे मंत्री शपथ घेणार

| Updated on: Jun 04, 2022 | 5:43 PM

ओडिशा मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मंत्र्यांचे राजीनामे म्हणजे 2024 ला होणारी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करणं आणि पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या दृष्टीनं उचललेलं पाऊल मानलं जात आहे.

Odisha Cabinet reshuffle : ओडिशात मोठी राजकीय घडामोड, बिजू जनता दलाच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा! उद्या नवे मंत्री शपथ घेणार
ओडिशातील बिजू जनता दलाच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : ओडिशा मंत्रिमंडळात (Odisha Cabinet) मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे. एनआयएने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार ओडिशाच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी राजीनामा (Resignation) दिलाय. रविवारी दुपारी 12 वाजता नवे मंत्री शपथ घेतील. ओडिशातील सत्ताधारी बीजू जनता दलाने (Biju Janata Dal) 29 मे 2022 रोजी आपला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलाय. अशावेळी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत दिले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मंत्र्यांचे राजीनामे म्हणजे 2024 ला होणारी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करणं आणि पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या दृष्टीनं उचललेलं पाऊल मानलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारमधील सर्व 20 मंत्र्यांनी ओडिशा विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. आता रविवारी दुपारी नवे मंत्री राजभवनातील कन्व्हेंशन हॉलमध्ये शपथ घेतील. अशावेळी प्रदीप अमात आणि लतिका प्रधान यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला दोन वर्षाचा कालावधी बाकी आहे. 2024 मध्ये ओडिशा विधानसभेचीही निवडणूक आहे. अशावेळी पार्टी मजबूत करणे आणि पुन्हा एकदा लोकांमध्ये पक्षाची भूमिका घेऊन जाण्यासाठी पक्ष नेतृत्व कामाला लागलं आहे. त्यासाठीच मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिपद मिळणार नाही

ब्रजराजनगर पोटनिवडणुकीत बिजू जनता दलाला विजय मिळाला होता. तसंच नवीन पटनाईक यांच्या पाचव्या कार्यकाळाचे तीन वर्षेही पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत दिले जात होते. BJD ने ब्रजराजनगरच्या उमेदवार अलका मोहंती यांच्या प्रचारासाठी जवळपास 1 डझन मंत्री आणि 25 पेक्षा अधिक आमदारांना उतरवलं होतं. या जागेवर विजय मिळवण्यासाठी पक्षाने मोठी मेहनत घेतली. अशावेळी अलका मोहंती यांना मंत्रिमंडळ फेरबदलात स्थान मिळू शकतं. तर दुसरीकडे वादग्रस्त ठरलेले आणि राज्य सरकारची प्रतिमा खराब करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

कोणकोणत्या मंत्र्यांचा राजीनामा?

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सूचनेनंतर स्पीकर सूर्य नारायण पात्रो, वाणिज्य आणि परिवहन मंत्री पद्मनाभ बेहरा, सूचना आणि जनसंपर्क मंत्री रघुनंदन दास, खान मंत्री प्रफुल्ल कुमार मलिक, कौशल्य विकास आणि शिक्षणमंत्री प्रेमानंद नायक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारानुसार राजीनामे देण्यात आले आहेत. ते योग्य वेळी निर्णय घेतील.