दिल्ली : ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यातील ( Balasore Train Accident ) रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी सुरु आहे. शुक्रवार 2 जूनच्या सायंकाळी कोरोमंडल ट्रेनची लूपलाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीशी जबरदस्त टक्कर होऊन 275 हून अधिक प्रवासी ठार तर 1100 हून अधिक प्रवासी ( Train Passenger ) जखमी झाले होते. दरम्यान, कोरोमंडळ एक्सप्रेसचे ( Coromandel Express ) चालक गुनानिधी मोहंती यांना भेटूच दिले जात नसल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे. गुनानिधी मोहंती हे कटक पासून दहा किमीवर असलेल्या नाहरपांडा गावचे रहीवासी आहेत. येथील चौकात, गल्लीबोळात, पान टपरीवर या भीषण अपघाताच्या चर्चा सुरु आहेत.
गुनानिधी मोहंती यांचे वडील बिष्णूचरण मोहंती म्हणतात की, प्रत्येकाला वाटते या अपघाताला माझा मुलगाच जबाबदार आहे. परंतू तो गेल्या 27 वर्षांपासून ट्रेन चालवित आहे. त्याच्या हातून कधी चूक झाली नाही. आम्हाला त्याच्याशी बोलायचं आहे जर त्याच्याशी आम्ही बोललोच नाही तर कळणार कसे ? की त्या सायंकाळी नेमके काय झाले होते ? हताशपणे बिष्णूचरण यांनी हिंदूस्थान टाईम्सशी बोलताना सांगितले. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या आरोग्य विभागातील एक डॉक्टरने सांगितले की, चार दिवसांपूर्वी गुनानिधींना डीस्चार्ज देण्यात आला होता. परंतू त्यांच्या पालकांना गुनानिधी कुठे आहेत हेच माहीती नाही. त्यांच्या कुटुंबियांना असे वाटतंय की गुनानिधी अजून हॉस्पिटलमध्येच आहेत.
गुनानिधी ईस्ट कोस्ट रेल्वेत सेवेतअसून तेथे त्यांच्याबाबत काहीही माहिती नाही. ईस्ट कोस्ट रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विकास कुमार यांनी सांगितले की आरोग्य ही खाजगी बाब आहे. आम्ही त्यावर काही टीप्पणी करु शकत नाही, या प्रकरणात रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि सीबीआय अशा दोन प्रकारच्या चौकशी सुरु आहेत. त्यामुळे यावर आम्ही काही बोलू शकत नाही. एएमआरआय हॉस्पिटलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट दोघांना चार-पाच दिवसांपूर्वी डीस्चार्ज देण्यात आला होता.
आम्हाला विश्वास आहे की अपघाताला तो जबाबदार नाही. त्यांनी 1996 पासून मालगाडीचे ड्रायव्हर म्हणून सेवेला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी त्यांनी पॅसेंजर ट्रेनची ड्यूटी मिळाली. ट्रेन कोणत्या ट्र्रॅकवर चालवायची याचे नियंत्रण ड्रायव्हर पेक्षा स्टेशन मास्तर, स्वयंचलित सिग्नल यंत्रणेवर असते असे आपला भाऊ सांगायचा असे त्यांचे बंधू संजय माेहंती यांनी म्हटले आहे. कोरोमंडल एक्सप्रेसला त्या ट्रॅकवर दर ताशी 130 किमी वेगाने चालविण्याची परवानगी होती. प्रत्यक्षात ट्रेन त्यावेळी 128 किमी वेगाने चालविण्यात आली होती.