प्रयागराज | 23 जानेवारी 2024 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका वृद्धाला अचानक हृदयविकाराचा झटका आला, पण त्यांनी शहाणपणा दाखवला. त्यांच्याकडे राम किट होता, त्यांनी त्याचा वापर केला आणि त्यांचा जीव वाचला. शहरातील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलतर्फे या वृद्धाला मोफत राम किट देण्यात आले. उमेश असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून ते ६० वर्षांचे आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
प्रयागराज येथील मयूराबाद येथे राहणाऱ्या ६० वर्षीय उमेश यांना राम उत्सवानिमित्त लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांकडून मोफत वाटप करण्यात आलेल्या राम किटमुळे नवजीवन मिळाले. उमेश यांची पत्नी आशा सांगते की, रविवारी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते बेशुद्ध होऊ लागले. अचानक त्यांना आठवलं की काही दिवसांपूर्वी आपल्याला राम किट मिळालं होतं. त्या किटमधील औषधं त्यांनी घेतली . त्यामुळे ते स्थिर झाले आणि त्यांना रुग्णालयात जाण्याची संधी मिळाली आणि जीव वाचला.
उमेश हे व्यवसायाने ड्रायव्हर असून त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते कारमध्येच होते. उमेशने डोकं लढवत पाकिटातून राम किट काढलं, त्यावरील सूचना नीट वाचल्या. त्यानंतर त्याने किटमधील तीनही औषधी घेतली. त्यांची प्रकृती पाहून रस्त्यावरील इतर लोकंही मदतीसाठी धावले आणि त्यांना तातडीने बेली रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता, उमेश यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये रेफर केले.
‘राम किट’ची औषधे जीवनरक्षक ठरली
कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या जनरल फिजिशियन डॉ. वैशाली सिंग सांगतात की, जेव्हा उमेश यांची हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांचे बीपी 60-40 आणि पल्स 22 होती, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पण सुदैवाने त्यांच्याकडे राम किटची औषधे होती, तीच त्यांच्यासाठी जीवनरक्षक ठरली. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. उमेशची पत्नी आशा देवी सांगतात की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते संपूर्ण वेळ रामाचा जप करत होते. मी एवढेच म्हणेन की प्रभू रामाने माझ्या पतीचे प्राण वाचवले आहेत, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
राम किट आहे तरी काय ?
हृदयविकार असलेल्या रुग्णांना इमर्जन्सी मध्ये उपयोगी पडावी या उद्देशाने राम किट तयार करण्यात आला आहे. डॉक्टर वैशाली सिंह सांगतात की त्या किटमध्ये अत्यावश्यक औषधे आणि हॉस्पिटल हेल्पलाइन नंबर देखील समाविष्ट आहेत. राम किटमध्ये तीन आवश्यक औषधांचा समावेश आहे. त्यात ॲस्पिरिन (रक्त पातळ करण्यासाठी), रोसुवास्टॅटिन (कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी) आणि सोर्विट्रेट (हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी) सारखी औषधे आहेत जी हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या प्रत्येकास त्वरित आराम देण्यासाठी उपयुक्त आहेत. हिवाळ्यात हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोकचे रुग्ण वाढत असल्याने राम किट उपयुक्त ठरेल.प्रत्येकजण देवावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवतो म्हणून या किटचे नाव प्रभू रामाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.