नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये (Punjab)भाजपसह काँग्रेसला धुळ चारत आपने सत्ता संपादन केली होती. त्यानंतर देशात आपचे कौतुक केले जात होते. मात्र आता याच आपला पंजाबमध्ये मान खाली घालावी लागल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांनी आपल्याच मंत्र्याचा राजीनामा घेत त्याच्याविरोधात करवाईचे आदेश दिले आहे. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांचे वक्तव्य समोर आले आहे. भगवंत मान यांच्या या पावलाचे कौतुक करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, भगवंत मान यांचा आम्हाला अभिमान आहे. आम आदमी पक्षाच्या गळ्यावर सुरी चालवली तरी चालेल पण देशासोबत गद्दारी नाही हेच येथे सिद्ध झाले आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले की, या भ्रष्टाचाराची कोणालाही माहिती नव्हती. याची माहिती ना विरोधकांना होती ना मीडियाला. भगवंत मान यांना हवे असते तर ते मंत्रिपदाची मांडणी करून त्यांचा वाटा मागू शकले असते. आत्तापर्यंत असे होते. मान यांना हवे असते तर ते प्रकरण दाबू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनीच आपल्या मंत्र्यावर कारवाई केली. भगवंत, संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 2015 मध्ये दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाले तेव्हा मी माझ्या अन्नमंत्र्यांवरही अशीच कारवाई केली होती. त्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आले होते. तेव्हाही कोणालाच कळले नाही. मी स्वतः त्याच्यावर कारवाई केली. आम आदमी पार्टी हा कट्टर प्रामाणिक पक्ष आहे. तसेच जर आमच्यातील कोणी चोरी केली तर आपण त्यालाही सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी आप पक्षातील नेत्यांना दिला आहे.
विरोधकांवर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले की, विरोधकांना काय करावे हे समजत नाही. आणि लोक म्हणत आहेत की, आप सरकार येताच येथे 2 महिन्यातच भ्रष्टाचार सुरू झाला आहे. पण हे पहिले सरकार आहे, जे आपल्याच लोकांवर कारवाई करत आहे. आम्ही कोणाचाही विश्वासघात करणार नाही आणि करूही देणार नाही. आपण जे केले ते करण्यासाठी खूप धैर्य लागते. आणि हे धैर्य आपल्याला देवाकडून मिळते.
पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले विजय सिंगला यांची मंगळवारी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. पंजाब सरकारच्या या कारवाईनंतर काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंगला यांच्यावरही कारवाई केली. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेवरून एसीबीने विजय सिंगला याला अटक केल्याचे बोलले जात आहे.
अधिकार्यांकडून कंत्राटावर एक टक्का कमिशन मागणे आणि भ्रष्टाचार केल्याच्या आरोप विजय सिंगला यांच्यावर होत होता. विजय सिंगला यांच्या भ्रष्टाचारात गुंतल्याच्या आरोपाबाबत सबळ पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली.