दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासांची संख्या ही फार मोठी आहे. परवडणारे दर, सुरक्षित प्रवास आणि वेळे पोहचण्याची हमी या कारणांमुळे रेल्वे प्रवासाला प्रथम प्राधान्य दिलं जातं. प्रवासात हक्काची जागा मिळवण्यासाठी अनेक प्रवासी आधीच तिकीट काढून ठेवतात. त्यामुळे काही आठवड्यांआधीच बहुतांश गाडी फुल होते. तर काहीवेळा अनेक कारणांमुळे आरक्षित तिकीट रद्द करतात. त्यामुळे ऐन क्षणी वेटिंगवर असलेल्यांना कन्फर्म तिकीट मिळते. त्यामुळेच अनेक प्रवासी वेटिंग तिकीट काढून ठेवतात. मात्र नेहमीच वेटिंग तिकीट कन्फर्म होईल,असं नसतं. त्यामुळे वेटिंग तिकीट असूनही प्रवाशांना रिझर्व्ह कोचमधून प्रवास करता येत नाही.
वेटिंग तिकीट असलेल्यांना किमान राखीव डब्ब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. यावर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी काय म्हटलं हे जाणून घेऊयात.
केंद्र सरकारकडून गेल्या शुक्रवारी वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना राखीव डब्ब्यातून प्रवास करणं अधिकृत नाही, असं सांगण्यात आलं. राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या प्रश्नावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे लेखी उत्तर दिलं. कन्फर्म तिकीट न मिळाल्याने गेल्या 3 वर्षात वेटिंग तिकीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी खासदार संजय सिंह यांनी केली. तसेच वेटिंग तिकीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून काय केलं जातंय? याची माहितीही संजय सिंह यांनी मागितली होती.
“वेटिंग तिकीटवर जनरल कोचमधून आणि राखीव डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यांची कोणतीही माहिती ठेवली जात नाही. भारतीय रेल्वे अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या प्रत्येक एक्सप्रेस गाडीच्या वेटिंग लिस्टकडे प्रशासन बारीक लक्ष ठेवून असतं. सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाढीव गाड्या सोडल्या जातात. इतकंच नाही, तर विविध गाड्यांमध्ये कायमस्वरुपी आणि हंगामी तत्वावर विविध श्रेणीत अधिकच्या जागा उपलब्ध करुन दिल्या जातात. यामध्ये स्लिपर कोचचाही समावेश आहे”, असं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं.
होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची मोठी संख्या असते. अशात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने काय केलं? याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली. “यंदा 2024 या वर्षात होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना त्यांना अपेक्षित स्थळी पोहचवण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या 13 हजार 523 फेऱ्या करण्यात आल्या”, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली.