नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याकडून होत असलेले आरोप आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निकटवर्तीयांची ईडीकडून (ED) झालेली अटक आणि होत असलेली चौकशी या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज थेट भाजप विरोधात डरकाळीच फोडली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ईडीवरही हल्ला चढवला. ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रातच कसे? यूपी, बिहार आणि दिल्लीत कसे नाहीत?, असा सवाल करतानाच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठीचा हा डाव आहे. त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा इशारा देतानाच लेटरबॉम्बही टाकला आहे.
अनिल देशमुखांच्या शेजारील कोठडीत जावं लागेल असं भाजप नेते वारंवार सांगत आहे. मी त्यांना सांगतो, तुम्हाला देखील तिथेच जावं लागेल. तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. सरकार पडत नाही म्हटल्यावर आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता जास्त बोलत नाही. ईडीला कायदेशीरपणे कारवाई करायची आहे तर त्यांनी करावी. ईडीच्या कार्यालयात काय चाललंय? याचे सूत्रधार कोण आहेत? हे लवकरच मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच तुम्ही मुंबईत दादागिरी करता, महाराष्ट्रातील लोकांना बाहेरची लोकं सुपाऱ्या घेऊन येतात. 12-12 तास डांबून ठेवतात. धमक्या देतात. मुंबई पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी असं माझं आवाहन आहे, असं राऊत म्हणाले.
माझ्या मुलीच्या लग्नातील फूलवाल्याला उचलून आणतात. किती रुपये मिळाले असं त्याला विचारतात. त्याने पैसे नाही घेतले तर त्याला प्रश्न विचारले जातात. माझ्या घरातलं लग्न आहे. लोकांना उचलून गन पॉइंटवर त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. अंदर डाल दूंगा तुमको, असं धमकावलं जात आहे.
ईडीच्या ऑफिसमध्ये कोण लोकं बेकायदेशीरपणे जाऊन बसतात? जी दोन-तीन लोकं जातात, ईडीला ब्रीफ करतात, ईडीला आदेश देतात, कोणाला टॉर्चर करतात, मी फडणवीसांना आव्हान करतोय… आणि त्यांना कळलं असणार मला काय सांगायचंय ते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
सरकार पाडण्यासाठी हे सगळे प्रयत्न होत आहेत. खोटे पुरावे तयार केले जात आहेत. कुणीतरी उठतो बेवड्यासारखा बडबडतो आणि कारवाई करतो. मी पुढची पत्रकार परिषद सेना भवनात घेणार आहे. त्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार आहे. हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून देणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
‘पुढची पत्रकार परिषद सेना भवनात, मग थेट ED कार्यालयासमोरच!’ असं राऊतांनी का म्हटलं?