President Election 2022: यशवंत सिन्हा होणार राष्ट्रपतीपदाचे विरोधी गटाचे उमेदवार!

| Updated on: Jun 21, 2022 | 4:22 PM

विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या मागील बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही मांडला होता. मात्र पवारांनी नकार दिला होता. याशिवाय गोपाळ कृष्ण गांधी यांचेही नाव पुढे आले होते. त्यांनी देखील यासाठी नकार दिला होता. त्यानंतर आता सिन्हा यांचे नाव पुढे आले आहे.

President Election 2022: यशवंत सिन्हा होणार राष्ट्रपतीपदाचे विरोधी गटाचे उमेदवार!
यशवंत सिन्हा
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक (Presidential Election) आणि उमेदवाराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यशवंत सिन्हा 27 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील असे मानले जात आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या मागील बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही मांडला होता. मात्र पवारांनी नकार दिला होता. याशिवाय गोपाळ कृष्ण गांधी यांचेही नाव पुढे आले होते. त्यांनी देखील यासाठी नकार दिला होता. त्यानंतर आता सिन्हा यांचे नाव पुढे आले आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यातच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांशी संपर्क साधला होता. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही अनेक विरोधी नेत्यांशी संवाद साधला होता. मात्र, त्यानंतरही सरकारकडून विरोधकांसमोर कोणतेच नाव ठेवले गेले नाही. अद्यापही सत्ताधारी भाजपकडून अध्यक्षपदासाठी अधिकृत नाव पुढे आलेले नाही. विरोधी पक्षांच्या या बैठकीला 13 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह सर्व पक्षांचे प्रतिनिधी होते. विरोधकांचे म्हणणे आहे की, राष्ट्रपती सर्वसंमतीने निवडला जावा.

हे सुद्धा वाचा

दरम्यान आजच्या या बैठकीच्या आधी यशवंत सिन्हा यांनी ट्विट केले की, ममता बॅनर्जी यांनी मला टीएमसीमध्ये जो सन्मान आणि प्रतिष्ठा दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता वेळ आली आहे की एका मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी मी पक्षापासून दूर राहून विरोधी ऐक्यासाठी काम केले पाहिजे. मला खात्री आहे की पक्ष माझं ही कृती मान्य करेल.

तर आज होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत TMC राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे सांगण्यात येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या विषयावर चर्चा केल्यानंतर सिन्हा यांनी या प्रस्तावाला होकार दिला आहे. दुसरीकडे, यशवंत सिन्हा यांनी बैठकीपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये मोठ्या राष्ट्रीय कारणांसाठी पक्षाच्या कार्यातून माघार घेतल्याची घोषणा केली.

तीन बड्या नेत्यांनी विरोधकांचा प्रस्ताव नाकारला

शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपाळ कृष्ण गांधी यांनी विरोधकांचा प्रस्ताव आधीच नाकारला होता. महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी आपले नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांचे आभार मानले आणि निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली. अशा स्थितीत आता विरोधक यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देऊ केली आहे. दुसरीकडे यशवंत सिन्हा यांनी ट्विट करून या अटकळांना हवा दिली होती. वास्तविक यशवंत सिन्हा यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.