13 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण देश हादरला होता. यापूर्वी याच तारखेला दहशतवाद्यांनी जुन्या संसदेवर हल्ला चढवला होता. नेमका तोच दिवस निवडत देशातील चार तरुणांनी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावला होता. यातील दोन तरुण लोकसभेच्या सभागृहात पोहचले होते. स्मोक क्रॅकर्सचा वापर केला होता. त्यांनी कुणाला इजा पोहचवली नाही. देशातील देशातील दडपशाहीविरोधात घोषणा दिल्या होत्या. यामध्ये एक तरुण महाराष्ट्रातील आहे. प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.
तपास केला पूर्ण
संसद सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावल्याप्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तपास पूर्ण केला. पटियाला हाऊस कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात जवळपास 1000 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार
आरोपींविरोधात IPC कलम 186 आणि UAPA चे कलम 13 अंतर्गत खटला चालविण्यासाठी अतिरिक्त, पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मंजुरी आवश्यक आहे. पोलीस या परवानगीची प्रतिक्षा करत असल्याची बाजू विशेष सरकारी वकील अखंत प्रताप सिंह यांनी न्यायालयात मांडली. अतिरिक्त सत्र न्यायाधीस डॉ. हरदीप कौर यांनी अतिरिक्त दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी 15 जुलैपर्यंत कालावधी वाढवून दिला. तोपर्यंत 6 आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढविण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
13 डिसेंबर 2023 रोजी संसदेचे नियमीत कामकाज सुरु होते. त्यावेळी अचानक दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उड्या घेतल्या. त्यातील एकाने स्मोक क्रॅकर्स फोडले. त्यामुळे सभागृहात लाल धूर झाला आणि श्वास घेण्यास त्रास झाला. संसदेतील सदस्यांनी दोघा तरुणांना तात्काळ पकडले. हे तरुण दडपशाहीविरोधात घोषणा देत होते. तर संसदेबाहेर एक तरुण आणि तरुणीला सुरक्षा रक्षकांनी घोषणाबाजी करताना पकडले. पोलिसांनी याप्रकरणी धरपकड केली. प्रकरणात पोलिसांनी मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम आझाद, ललित झा आणि महेश कुमावत यांना अटक केली आणि त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. 15 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.