नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या आठवड्यात सुरु झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरवात झाली. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे. मात्र, विरोधकांच्या गोंधळामुळे त्यावर अद्याप चर्चा सुरु झालेली नाही. आजही संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी उद्योगपती अदानी यांचा मुद्दा उपस्थित करून गदारोळ घातला. यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या समुहाने फसवणूक केल्याचा आणि शेअरच्या किंमतीमध्ये फेरफार केल्याचा ठपका हिंडेनबर्ग रिसर्चने ठेवला आहे. यानंतर अदानी समूहाच्या शेअरच्या किमती जागतिक स्तरावर झपाट्याने घसरल्या. अदानी प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधक एकवटले आहेत. त्यांनी संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमण्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीवर विरोधक ठाम असून त्यांनी संसदेचे कामकाज रोखून धरले आहे. आजही लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला.
केंद्र सरकार अदानी प्रकरणावर मौन बाळगून आहे. त्यामुळे संशयाची सुई केंद्र सरकारच्या दिशेने वळत असून केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली. काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी अदानी प्रकरणावर आम्हाला संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी हवी आहे. पण सरकार काही तरी लपवू पहात आहे. सरकारचे गुपित उघड झाले असून त्यांनी याबाबत स्पष्टता आणावी अशी मागणी केली.
काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनीही, आम्ही २६७ अन्वये दिलेल्या नोटीसवर चर्चा व्हायला हवी. राष्ट्रपतींच्या अभिभाषण आणि हा वेगळा विषय आहे. त्यामुळे आधी त्या विषयावर आधी चर्चा व्हावी अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.
काँग्रेस आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी गदारोळ घालण्यास सुरवात केली. यामुळे संसदेचे दोन्ही सभागृह दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर संसद परिसरातील गांधीजींच्या पुतळ्याजवळ विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हा केवळ काँग्रेस पक्षाचा मुद्दा नाही तर देशाचा प्रश्न आहे. त्यामुळे विरोधक या मुद्द्यावरुन एकत्र झाले आहेत. याबाबत आमची काय रणनीती असेल हे सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे ठरवू असे काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.