नवी दिल्ली : रेल्वे स्थानक म्हणजे ट्रेनच्या अनाऊन्समेंटचा सतत सुरू असलेला मारा अशी ओळख असते. परंतू आता देशातील या स्थानकावर ‘यात्रीगण कृपया ध्यान दे’ अशी अनाऊन्समेंट ऐकू येणार नाही. येथे पब्लिक अनाऊन्समेंटची यंत्रणा सध्या शांत आहे. या स्थानकाचे नाव डॉ.एम.जी. रामचंद्रन सेंट्रल स्थानक ( Puratchi Thalaivar Dr. M.G. Ramachandran ) आहे, ज्याला चेन्नई सेंट्रल स्थानक या नावाने ओळखले जाते. हे देशातील पहीले सायलेंट स्थानक बनले आहे.
देशाच्या पहिल्या सायलेंट स्थानकाचा दर्जा
देशातील अनेक स्थानकांवर अनाऊन्समेंटसाठी ध्वनीक्षेपकाचा वापर केला जातो. परंतू देशातील चेन्नई सेंट्रल स्थानकाला पहिल्या सायलन्ट स्थानकाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या स्थानकावर मोठ्या आवाजात होणारी उद्घोषणा बंद झाली आहे. या ऐवजी या स्थानकावर विमानतळावर दिसतात त्याप्रमाणे मोठमोठे साईन बोर्ड लावले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता त्यांच्या गाड्यांची माहिती साईनबोर्डद्वारे मिळत आहे. सर्व व्हीज्युअल डिस्प्ले कार्यरत रहातील अशी काळजी बाळगण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. तसेच चौकशी खिडक्यांवर आवश्यक कर्मचारी तैनात करण्यासाठी सांगितले आहे.
रविवारपासून आहे शांतता
चेन्नईतील दीडशे वर्षे जुन्या रेल्वे स्थानकावरील लाऊड स्पिकर रविवारपासून शांत आहे. या स्थानकातील सर्व प्रकारच्या उद्घोषना बंद केल्याने ध्वनी प्रदुषण कमी झाले आहे. त्यामुळे शांततेचा अनुभव लोकांना मिळत आहे. एरव्ही देखील या उद्घोषनामुळे फायदा कमी तोटाच जास्त होत असतो.
लोकल ट्रेनसाठी सुरू आहे अनाऊन्समेंट
या स्थानकावर सर्वच उद्घोषणा बंद करण्यात आलेल्या नाहीत. तर केवळ लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या घोषणा बंद केल्या आहेत. चेन्नईतून धावणाऱ्या उपनगरीय लोकल गाड्यांची घोषणा मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांकडून आलेल्या प्रतिसादानंतर या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार आहे. स्थानकांवर एण्ट्री पॉईंटवर डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच चौकशी काऊंटर वाढवण्यात आले आहेत.
प्रवाशांना होत आहे अडचण
सायलेंट स्टेशन हा प्रकल्प जरी चांगला असला तरी काही रेल्वे प्रवाशांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला साईन बोर्ड वर मान करून पहावे लागत आहेत. अनाऊन्समेंट कशा स्थितीत कानावर पडत असते असा दावा काही प्रवाशांनी करीत या योजनेवर टीका केली आहे. ज्यांची लांबची नजर चांगली नाही अशा ज्येष्ठ मंडळीनी या योजनेवर टीका केली आहे.