उत्तर प्रदेश : रेल्वे प्रवासात प्रवाशांना काही असुविधा झाल्यास ट्रेन थांबविली जात असते, परंतू लखनऊ -वाराणसी- कृषक एक्सप्रेस अनोख्या कारणाने वैद्यकीय इमर्जन्सी झाल्याने रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढलेल्या तीन प्रवाशांना अचानक उलट्या झाल्याने मेडीकल टीम दाखल झाली. नेमके काय झाले ते पाहा…
लखनऊ वाराणसी कृषक एक्सप्रेसमध्ये लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढलेल्या या तीन प्रवाशांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना उलट्या झाल्या. एसी बी 5 कोचमधून प्रवास करणाऱ्या एका 70 वर्षीय पुरूष आणि दोन महिलांना चक्कर आली आणि त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे बादशाहनगर स्थानकावर रेल्वेने डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात केले. त्यानंतर तपासणीनंतर रेल्वे अधिकाऱ्यांना या मागील खरे कारण कळले आणि ते आश्चर्यचकीत झाले. त्यांना दिलेले ब्लँकेट बदलून टाकले. त्यामुळे अर्धा तास ट्रेन थांबविण्यात येऊन पुढील प्रवासाला रवाना झाली.
प्रवाशांना पुरविण्यात आलेल्या रेल्वेच्या ब्लँकेटमधून विचित्र कुबट दुर्गंधी येत असल्याची तक्रार त्यांनी ट्रेन सुपरवायझरला केली त्यानंतर ट्रेन थांबविण्यात आली. त्यानंतर तातडीने ब्लँकेट आणि बेडरोल बदलून देण्यात आले. प्रवाशांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केल्याने ट्रेन अर्धा तास थांबवण्यात आल्याचे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज सिंह यांनी सांगितले.