लखनऊ | 14 फेब्रुवारी 2024 : लग्न म्हटलं की वाद, रुसवे-फुगवे, मानापमान होतच राहतात. चार डोकी एकत्र आली की एखाद्या गोष्टीवरनून वाजू शकतं. प्रत्येक लग्नात असा एखादा किस्सा घडतच असतो. तेव्हा टेन्शन येतं पण कालांतराने ते आठवलं की हसूच फुटतं. लग्नातील असाच एक अजब प्रकार उत्तर प्रदेशच्या अलीगढ जवळ घडला. जेवणात गोड पदार्थ म्हणून रसगुल्ला होता. तो सर्वांना आवडतोच. पण अचानक जेवणातील रसगुल्ला संपल्याची हाकाटी अचानक उठली आणि लग्नघरात धुमश्चक्री सुरू झाली. यामुळे गदारोळ निर्माण झाला. त्याचवेळी दोन पक्षांदरम्यान एका मुद्यावरून वाजलं आणि त्यामुळे वाद वाढून दे दणादण मारामारी देखील झाली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. हे प्रकरण सासनीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुजपुरा येथील आशु गार्डन मॅरेज होम येथे घडलं. या हॉलमध्ये लग्न समारंभ सुरू होता. सगळेच त्याच व्यस्त होते. आनंदाचं वातावरण होतं. मात्र त्याचदरम्यान रसगुल्ला संपल्याची बातमी कुठूनतरी आली. त्यामुळे अवघ्या काही सेकंदात लग्नमंडपातील वातावरण बदलले. वर-वधू पक्षाच्या लोकांनी एकमेकांना जाब विचारायला सुरूवात केली. शब्दाने शब्द वाढला आणि प्रकरण चांगलंच पेटलं. काही वेळातच हा वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. त्यात महिलांचाही सहभाग होता. समोर जे दिसेल ते उचलून लोक एकमेकांना मारायला लागले. एवढंच नव्हे तर लोकांनी खुर्च्याही फेकायला सुरुवात केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इथे पहा व्हिडीओ
Chair-Kalesh in Marriage Ceremony over Sweet’s me Rasgulla nahi mila, Aligarh UP
pic.twitter.com/1ke5WueK1v— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 12, 2024
आधीपासूनच सुरू होता वाद
याबद्दल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वधूचा भाऊ आणि वहिनी यांच्यात आधीपासून काही कारणावरून वाद सुरू होता. ते पती-पत्नी दोघेही वेगळे राहतात. मात्र बहिणीच्या लग्नासाठी तिचा भाऊ तिकडे आला. ही गोष्ट त्याची पत्नी आणि भावांना समजताच दोन्ही बाजूचे लोक तेथे समोरासमोर आले. आधी त्यांच्यात बाचाबाची झाली, नंतर वाद टोकाला गेल्यावर हाणामारी झाली. त्यात वराकडच्या लोकांनीही नाक खुपसल आणि भांडण वाढलं. कोणाला काही कळत नव्हतं , लोकांनी थेट खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकायला सुरूवात केली. तेवढ्यात काही मोठ्या मंडळींनी मध्यस्थी करत हे भांडण थांबवलं, समजूत काढली. त्यामुळे दोन्ही पक्षांनी पोलिसांत तक्रार केली नाही.
या संदर्भात पोलिसांनी सांगितलं की, सासनी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आशु गार्डन मॅरेज होमशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लग्न समारंभात काही गोष्टींवरून दोन पक्षांमध्ये वाद झाला. पण दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र बसून या प्रकरणावर तोडगा काढला. आता हे प्रकरण शांत झालं आहे.