वडोदरा : महिला रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सैदव तत्पर असलेल्या पश्चिम रेल्वेने आता महिलांच्या पर्सनल हायजिन प्रोडक्टची विक्री करणाऱ्या वेंडिंग मशिनची सुविधा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा डीव्हीजनद्वारा अशा आधुनिक वेंडिंग मशिनना मोजक्याच स्थानकांवर बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सोय होणार आहे.
पश्चिम रेल्वेने महिला प्रवाशांच्या सोयीसाठी अनोख्या वेंडिंग मशिन बसविण्याचा शुभारंभ केला आहे.
या वस्तूंची होणार विक्री
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क प्रमुख सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात माहिती देताना म्हटले आहे की, या वेंडिंग मशिनमध्ये कॅश टाकताच झटपट सॅनेटरी नॅपकीन, फेस मास्क, बेबी डायपर आदी हायजिन वस्तू महिलांना विकत घेता येणार आहेत. या मशिनची स्थापना आणि त्यातून विक्री होणाऱ्या वस्तू सर्व वयोगटातील महिलांच्या गरजा पूर्ण करतील आणि महिलांचा प्रवास सुखकर करतील असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.
या स्थानकांवर होणार विक्री
महिलांच्या पर्सनल हायजिन प्रोडक्टची विक्री करणाऱ्या वेंडिंग मशिन सध्या वडोदरा ( बडोदा ) , भरूच, आणंद आणि एकता नगर या स्थानकांवर प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आल्या आहेत. सध्या या मशिन मोजक्याच स्थानकांवर लावण्यात आल्या असल्या तरी भविष्यात मुंबई तसेच अन्यत्र या मशिन बसविण्याची योजना आहे.
रेल्वेची होणार कमाई
महिला प्रवाशांच्या पर्सनल हायजिन प्रोडक्टची विक्री करणाऱ्या वेंडिंग मशिनची सुविधा रेल्वे स्थानकांवर उपलब्ध झाल्यामुळे रेल्वेचा फायदा होणार आहे. या मशिनसाठी रेल्वे जागा आणि वीज उपलब्ध करणार आहे. तीन वर्षांसाठी कंपनीशी करार करण्यात आला असून दर वर्षाला रेल्वेला यातून 1,60,000/- रूपयांचा महसूल मिळणार आहे.
कॅश टाकताच हायजिन प्रोडक्ट
या मशिनमध्ये कॅश टाकताच मानवी स्पर्शाशिवाय महिलांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळणे सोपे होणार आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी यासारखे उपक्रम पश्चिम रेल्वे राबवित आली असून यामुळे महिलांना निर्धास्तपणे चिंतामुक्त प्रवास करता येणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सूमित ठाकूर यांनी सांगितले.