उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. हा व्यक्ती घरातून ऑफिसला जायला निघाला होता. त्यावेळी त्याला अचानक रस्त्याच्या बाजूला कार उभी करावी लागली. त्याच्या छातीत दुखत होतं. ड्रायव्हिंग सीटवर बसल्या बसल्याच त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर या व्यक्तिच्या नातेवाईकांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकारानेच झाला की अन्य कोणत्या कारणाने झाला याची माहिती घेण्याचं काम पोलीस करत आहेत. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहेत. मात्र, त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यावरच मृत्यूचं नेमकं कारण कळणार आहे.
पेशाने फार्मसिस्ट
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद यादव असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मूळचा आंबेडकर नगर येथील रहिवासी आहे. प्रयागराजच्या गंगापार हंडिया येएथील ऊपरदहा सामुदायिक आरोग्य केंद्रात तो फार्मसिस्ट म्हणून काम करत होता. झुसी परिसरातील मुंशी येथे तो भाड्याने राहत होता. नेहमीप्रमाणे आजही तो कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्याला अचानक मृत्यूने गाठले.
लोकांना वाटलं…
प्रमोद त्याची कार घेऊन झुंसी-सोनौटीच्या मार्गे कामावर जात होता. त्यावेळी अचानक त्याच्या छातीत जोराच्या कळा आल्या. त्याला दरदरून घाम फुटला. त्यामुळे त्याने त्याची कार रस्त्याच्या बाजूला घेतली आणि थोडावेळ शांत पडून राहण्याचा प्रयत्न केला. पण छातीतील दुखणं काही केल्या थांबत नव्हतं. आजूबाजूला काही लोक होते. ते फक्त त्याला पाहत होते. रस्त्याकडील लोकांना सर्व काही नॉर्मल असावं असं वाटलं होतं. मात्र, काहीवेळाने प्रमोद गाडीच्या एका बाजूला झुकल्याने लोकांना संशय आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं, तर त्यांना प्रमोद बेशुद्ध पडल्याचं दिसून आलं. त्यांचे श्वास थांबल्याचंही दिसून आलं. मृत्यूनंतरही त्यांचा एक हात स्टिअरिंगवर होता. या लोकांनी तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली. पोलीसही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेव्हा पोलिसांनी तपासून पाहिलं तेव्हा प्रमोदचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या लक्षातआलं. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी प्रमोदला मृत घोषित केलं.
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
कारमध्ये प्रमोदचा मृत्यू झाल्याची बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार प्रमोद कार चालवत होता. त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याने कार रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.