पीएचडी भाजीवाला, घर प्रपंचासाठी डॉक्टर विकतोय हातगाडीवर भाजीपाला

| Updated on: Jan 02, 2024 | 3:14 PM

घर, प्रपंच चालविण्यासाठी कोणत्याही कामाची लाज बाळगू नये असे म्हणतात. घर परिवारासाठी केलेलं कोणतंही काम हे उच्च दर्जाचंच मानलं जातं. आपल्या परिश्रमातून एक उच्च शिक्षित तरुणाने हे वास्तवात उतरून खरं करून दाखवलं.

पीएचडी भाजीवाला, घर प्रपंचासाठी डॉक्टर विकतोय हातगाडीवर भाजीपाला
PHD Sabji Wala
Follow us on

पंजाब | 1 जानेवारी 2024 : घर, प्रपंच चालविण्यासाठी कोणत्याही कामाची लाज बाळगू नये असे म्हणतात. घर परिवारासाठी केलेलं कोणतंही काम हे उच्च दर्जाचंच मानलं जातं. आपल्या परिश्रमातून एक उच्च शिक्षित तरुणाने हे वास्तवात उतरून खरं करून दाखवलं. या तरुणाने चार विषयात पदवी मिळविली. पीएचडी केली. 11 वर्ष कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली. मात्र, वेळ अशी आली की कुटुंबासाठी त्यांना घरोघरी जाऊन भाजी विकावी लागली. हा तरुण ज्या परिसरात भाजी विकतो त्या परिसरात त्याची ओळख पीएचडी भाजीवाला अशीच आहे. अमृतसरच्या या तरुणाची सोशल मिडीयावर एकच चर्चा सुरु आहे.

पीएचडी करूनही हातगाडीवर भाजीपाला विकणारा हा भाजीवाला पंजाबच्या अमृतसर येथे भाजी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. डॉ. संदीप सिंग असे या भाजी विक्रेत्या तरुणाचे नाव आहे. डॉ. संदीप सिंग यांनी पत्रकारिता, पंजाबी, राज्यशास्त्र आणि कायदा या चार विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी पीएचडीही केली आहे. मात्र, अजूनही ते पुढील अभ्यासाची तयारी करत आहेत.

डॉ. संदीप सिंग यांनी 11 वर्षे पंजाब विद्यापीठ, पटियाला येथे कायदा विभागात प्राध्यापक म्हणून काम केले. परंतु, त्यांची नोकरी कंत्राटी पद्धतीची होती. त्यामुळे पगार वेळेवर मिळत नसे. पगारातून काही रक्कम कापली जात असे. हाती आलेल्या रकमेतून त्यांना घर खर्च भागवावा लागत असे. पुढे पुढे तर पगार होण्यास विलंब होऊ लागला. अशा परिस्थितीत देयके देण्यास विलंब होऊ लागला. कपातीमुळे घराच्या गरजा भागवण्यात अडचणी येत होत्या. त्याला कंटाळून डॉ. संदीप सिंग यांनी प्राध्यापिकेची नोकरी सोडली.

प्राध्यापिकेची नोकरी सोडल्यानंतर डॉ. संदीप सिंग यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. आता भाजी विकून आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. डॉ. संदीप सिंग सांगतात, मी घरोघरी भाजीपाला गाडीवर विकतो. कंत्राटी प्राध्यापक म्हणून जेवढे कमावत होतो त्यापेक्षा जास्त कमाई भाजी विकून होते. भाजी विकून घरी जातो आणि पुढील परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यास करतो.

भाजी विकत असलो तरी मी शिकवण्यापासून ब्रेक घेतला आहे. शिकण्यापासून नाही. त्यामुळे पुढची तयारी सुरु आहे. अजूनही मी माझी आवड सोडलेली नाही. माझी काही स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्यासाठी बचत करत आहे. एक दिवस माझे स्वतःचे कोचिंग सेंटर उघडेन असेही त्यांनी सांगितले.