नवी दिल्लीः केंद्र सरकारने चालू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 12 वा हप्ता (12th installment) सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुका केल्या होत्या त्यांचे पैसे मात्र अडकण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर ईकेवायसीही (EKYC) केली नसेल तरीही खात्यावर पैसे येणार नसल्याचेही बोलले जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. त्यामुळे देशातील अनेकांच्या खात्यावर चार महिन्यातून दोन हजार रुपये मिळत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या योजनेतून 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्याच शेतकऱ्यांना 12 व्या हफ्त्याची आशा लागून राहिली आहे.
पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असं सांगण्यात आले आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान चार महिन्यांच्या अंतराने एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये या योजनेचा हफ्ता दिला जातो. त्यानंतर, दुसरा हफ्ता हा क्रमांक 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान खात्यावर जमा होतो तर 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे आता या सप्टेंबर महिन्यात तरी एक हफ्ता मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
ही योजना 2019 मध्ये सुरू झाली होती, तेव्हा या योजनेचा लाभ फक्त लहान आणि अत्यल्प शेतकऱ्यांनाच दिला जात होता. मात्र त्यानंतरच्या काळात या आराखड्यात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहे, आता देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अद्याप ई-केवायसी केली गेली नाही तर मात्र यावेळचा पीएम किसान योजनेचा हफ्ता चुकणार आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ताही लवकरच खात्याव जमा होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पैसे ट्रान्सफर होऊ शकतात, असे मानले जाते.
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुका केल्या होत्या, त्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळताना अडचणी येणार आहेत. आधार कार्ड आणि बँक खात्यावर असलेल्या नावात जर चुका आढळल्या तरीही पैसे मिळताना अडचणी येण्याची शक्यता आहे. बँक खाते बरोबर नसले तरीही तुमचे पैसे गोठवले जाऊ शकतात. त्यायाशिवाय आयकर भरणारे किंवा सरकारी संस्थांमध्ये काम करणारे नागरिकही या योजनेपासून वंचित राहणार आहे.