संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानावर त्यांचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यानंतर विकृत मानसिकतेने एकतेवर आघात केल्याचा प्रहार पंतप्रधानांनी काँग्रेसवर केला. काँग्रेसच्या माथ्यावरील संविधानाची गळचेपी करण्याचा कलंक कधीच मिटणार नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
भारत तिसरी मोठी आर्थिक शक्ती
आपला देश वेगाने विकास करत आहे. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. १४० देशवासियांचा संकल्प आहे. स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू तेव्हा आपला देश विकसित देश बनवण्याचं प्रत्येक भारतीयांचं स्वप्न आहे. त्यासाठी आपल्या देशाची एकता असली पाहिजे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
आपलं संविधान सुद्धा देशाच्या एकतेचा आधार आहे. संविधानाच्या निर्मितीच्या काळात मोठे लोक होते. साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षण तज्ज्ञ, स्वातंत्र्य सैनिक आणि समाजातील प्रत्येक वर्गातील लोक होते. सर्वच लोक भारताच्या एकतेच्या प्रति एकरूप होते. देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेले लोक होते. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की, समस्या ही आहे की, देशात जी विविधतेने भरलेलं जनमाणस आहे, त्याला कोणत्या पद्धतीने एकमत केलं पाहिजे. कसं देशातील लोकांना एक दुसऱ्यासोबत राहून निर्णय घेण्यासाठी प्रेरित केलं जावं. त्यामुळे देशात निर्णय घेताना एकताची भावना निर्माण झाली पाहिजे, अशी आशा यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली.
काँग्रेसवर जहरी टीका
मला खेदाने सांगावं लागतं की स्वातंत्र्यानंतर संविधान निर्मात्यांच्या मनात एकता होती. पण स्वातंत्र्यानंतर विकृत मानसिकता म्हणा किंवा स्वार्थाने म्हणा देशातील एकतेवर आघात झाला, काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हतोडा मारला. मनमानी कारभार केला, असा प्रहार त्यांनी केला. आणीबाणीच्या काळातील आठवणी जाग्या करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
विविधतेत एकता ही भारताची ताकद आहे. आपल्या देशाची प्रगती विविधतेत एकता साजरी करण्यावर आहे. पण गुलामीची मानसिकता असलेल्या लोकांनी, विविधतेत विरोधाभास शोधत आहे. एवढेच नव्हे तर विविधतेचा आमूल्य खजिना आहे आपला. त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे होतं. पण त्यात विष पेरण्याचं काम केलं. देशातील एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न होता. पण आपल्याला विविधतेते एकता आणावी लागेल. हीच बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली होईल, असे पंतप्रधान म्हणाले.