मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. दोन दिवसाच्या आपल्या गुजरात दौऱ्याची (Gujrat Tour) सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी आईसोबत केली. मोदी यांनी आज आईची भेत घेतली. आईसोबत त्यांनी देवाची पूजा केली, आईचे पाय धुतले, त्यांचा आशीर्वाद घेतला. तसंच आईला खास शाल भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes) दिल्या. त्यानंतर मोदींनी आईंना तर आई हिराबा यांनी मोदींना मिठाई भरवली. दिवसाची अशी छान सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईसाठी एक ब्लॉगही लिहिला आहे. त्यात मोदींनी आपल्या आईने उपसलेले कष्ट, आपलं बालपण ते पंतप्रधान पदापर्यंतची वाटचाल शब्दात मांडली आहे. त्यात मोदींनी आपल्या एका खास मित्राचा उल्लेख केलाय. त्या मित्राचं नाव अब्बास असं आहे. आई हिराबा ईदला अब्बासच्या आवडीचं जेवण बनवायची, असा उल्लेख मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये केलाय.
मोदी लिहितात की, आई नेहमीच इतरांना आनंदी बघून स्वतः आनंदी राहते, घरात जागा भले कमी असेल, पण तिचे मन मोठे आहे. आमच्या घराच्या जवळच एक गाव होते, जिथे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे स्नेही रहात असत. त्यांचा मुलगा होता, अब्बास. वडिलांच्या मित्राच्या अकाली निधनानंतर त्यांनी अब्बासला आमच्या घरीच आणले होते. घरातील इतर मुलांप्रमाणेच आई, अब्बासची देखील खूप काळजी घेत असे. ईद च्या दिवशी आई अब्बासकरता त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. सण उत्सवांच्या काळात जवळपासची काही मुले आमच्या घरी जेवायला येत असत, त्यांना आईच्या हातचे जेवण खूप आवडत असे.
पंतप्रधान मोदी पुढे लिहितात की, आमच्या घराच्या परिसरात जेव्हा एखादे साधू महात्मे येत असत, तेव्हा आई त्यांना घरी बोलावून अवश्य खाऊ घालायची. जेव्हा ते निघायचे तेव्हा आई स्वतःकरता नव्हे तर आम्हा मुलांकरता आशीर्वाद मागत असे. ती त्यांना म्हणायची की माझ्या मुलांना असा आशीर्वाद द्या की ते दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख मानतील आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतील. आपल्या मुलांमध्ये भक्ती आणि सेवाभाव जागृत होऊ दे, असा आशीर्वाद ती मागत असे. माझ्या आईचा माझ्यावर गाढ विश्वास आहे. तिला तिच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे.
Maa…this isn’t a mere word but it captures a range of emotions. Today, 18th June is the day my Mother Heeraba enters her 100th year. On this special day, I have penned a few thoughts expressing joy and gratitude. https://t.co/KnhBmUp2se
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022
‘मला अनेक दशकांपूर्वीची एक घटना आठवते. त्याकाळात मी संघटनेत असताना लोकसेवेच्या कामात गुंतलो होतो. कुटुंबियांशी अजिबात संपर्क नव्हता. याच काळात, एकदा माझा मोठा भाऊ माझ्या आईला बद्रीनाथ, केदारनाथच्या दर्शनासाठी घेऊन गेला होता. आईचे बद्रीनाथाचे दर्शन झाले तेव्हा केदारनाथमधील लोकांनाही माझी आई येत असल्याची बातमी मिळाली. त्याचवेळी अचानक हवामान खूप खराब झाले. हे पाहून काही लोक केदारघाटी उतरून खाली जाऊ लागले. ते आपल्यासोबत काही रजया देखील घेऊन गेले. ते रस्त्याने दिसणाऱ्या वयोवृद्ध महिलांना विचारत होते की तुम्ही नरेंद्र मोदींच्या आई आहात का? असेच विचारत विचारत ते आईला भेटले. त्यांनी आईला रजई दिली, चहा दिला, मग तर ते पूर्ण यात्रेच्या कालावधीत आईसोबतच राहिले. केदारनाथला पोहोचल्यावर त्यांनी आईच्या निवासाची चांगली सोय केली. या घटनेचा आईच्या मनावर मोठा परिणाम झाला. तीर्थयात्रेवरून परतल्यावर माझी आई मला भेटली तेव्हा ती म्हणाली, “तू काही चांगलं काम करत आहेस, लोक तुला ओळखतात”.
Took blessings of my mother today as she enters her 100th year… pic.twitter.com/lTEVGcyzdX
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022
मोदी पुढे लिहितात की, आता या घटनेला इतकी वर्षे होऊन गेल्यावर जेव्हा लोक आईच्या जवळ जाऊन तिला विचारतात की तुमचा मुलगा पंतप्रधान आहे, याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटत असेल, यावर आईचे उत्तर अतिशय सखोल आहे. आई त्यांना सांगते की जितका तुम्हाला अभिमान वाटतो, तितकाच मलाही वाटतो. तसेही माझे काहीच नाही, मी तर निमित्तमात्र आहे. तो तर देवाचा आहे. तुम्ही हेही पाहिलं असेल की, माझी आई कधीही कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात माझ्यासोबत जात नाही. आत्तापर्यंत दोनदाच ती माझ्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात आली आहे.