नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी बुधवारी पानिपत येथे 909 कोटी रुपये खर्चून 35 एकरांवर उभारलेल्या (2G) इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी काही दिवस आधी काळ्या फिती लावून सरकारविरोधात आनंदलनं केल्याबद्दल विरोधकांना घेरले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की आपल्या देशातही असे काही लोक आहेत, जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडलेले आहेत. सरकारविरोधात खोटे बोलूनही जनता अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. अशा नैराश्यात हे लोक आता काळ्या जादूकडे (Black Magic) वळताना दिसत आहेत, असा टोला त्यांनी काळे कपडे घालून आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना (Rahul Gandhi) लगावला. काळी जादू पसरवण्याचा कसा प्रयत्न झाला ते आम्ही 5 ऑगस्टला पाहिले. त्यांना असे वाटते की काळे कपडे परिधान केल्याने त्यांचा निराशेचा काळ संपेल, परंतु त्यांना हे माहित नाही की त्यांनी कितीही फुशारकी मारली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर पुन्हा कधीही निर्माण होणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी राहुल गांधी यांच्यावर चढवला.
त्याचवेळी काँग्रेसने पंतप्रधानांच्या या आरोपांना सडेतोड उत्तर दिलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट केलंय. त्या ट्विटमध्ये ते लिहितात, ते काळा पैसा आणण्यासाठी काहीही करू शकले नाहीत, आता ते काळ्या कपड्यांबाबत निरर्थक मुद्दा काढत आहेत. देशाला पंतप्रधानांनी त्यांच्या समस्यांबद्दल बोलावे असे वाटते, पण जुमलेबाज पंतप्रधान मोदी काहीही बोलत राहतात.
ये काला धन लाने के लिए तो कुछ कर नहीं पाए, अब काले कपड़ों को लेकर बेमतलब का मुद्दा बना रहे हैं।
देश चाहता है कि प्रधानमंत्री उनकी समस्याओं पर बात करें लेकिन जुमला जीवी कुछ भी बोलते रहते हैं। pic.twitter.com/YZNN8TCrCs
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 10, 2022
तसेच हे मोफत देऊ, ते मोफत देऊ, अशा घोषणांबाबत बोलताना, नरेंद्र मोदी म्हणाले की राजकारणात स्वार्थ असेल तर कोणीही येऊन मोफत पेट्रोल-डिझेल देण्याची घोषणा करू शकतो. अशी पावले आपल्या मुलांकडून त्यांचे हक्क हिरावून घेतील, देशाला स्वावलंबी होण्यापासून रोखतील, अशा स्वार्थी धोरणांमुळे देशाच्या प्रामाणिक करदात्याचा भारही वाढेल. आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशा घोषणा करणारे कधीही नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करणार नाहीत, असेही ते म्हणाले. ते शेतकऱ्याला खोटी आश्वासने देतील, पण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉलसारखे प्लांट कधीच लावणार नाहीत, असा टोलाही मोदींनी लगावला आहे.