नवी दिल्ली : देशाची राजधानी सध्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात अडकली आहे. जोरदार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. त्यामुळे संपूर्ण दिल्ली जलमय झालीये. पाण्याची पातळी आता कमी होत असली तरी देखील अनेक भागात पाणी साचले आहे. शनिवारी रात्री फ्रान्स दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी दिल्लीतील पुराची माहिती घेतली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रात्री 10 वाजेपर्यंत यमुनेच्या पाण्याची पातळी 206.87 मीटरवर पोहोचली आहे. शनिवारी संध्याकाळी देखील दिल्लीला पावसाने चांगलेच झोडपले. रविवार देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. (रविवारी) पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यातून येताच दिल्लीला परतल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पीएम मोदी फ्रान्स आणि यूएईच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावरून परतले आहेत.पंतप्रधान मोदी आज घरी पोहोचताच त्यांनी दिल्लीच्या उपराज्यपालांना फोन करुन माहिती दिली. दिल्लीतील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली आणि सुरू असलेल्या प्रयत्नांची संपूर्ण माहिती घेतली. केंद्र व राज्याच्या सहकार्याने जनतेच्या हिताची सर्व कामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
शनिवारी यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली असली तरी दिल्लीतील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. यामध्ये यमुना बाजार, लाल किल्ला, आयटीओ, बेला रोड आणि परिसरात अजूनही पाणी साचले आहे. सध्या एनडीआरएफच्या 16 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
शनिवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. यासोबतच IMD ने आजही पावसाचा इशारा दिला आहे. दिल्लीसह हिमाचल, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान यासह सुमारे 20 राज्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.