नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : देशात यावर्षी जवळपास 7 कोटींहून अधिक करदात्यांनी प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरला आहे. अनेक लोक कर बचतीसाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही जण अल्पबचत योजनांमध्ये बचत करतात. काही जण कर बचत मुदत ठेवीकडे पैसा वळवितात. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची बचत कोणत्या योजनांमध्ये (Tax Saving Scheme) करतात. कर वाचविण्यासाठी ते कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात, ते कर बचतीसाठी आणखी काय करतात, असे अनेक सवाल प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आले असतीलच. सर्वसामान्यांना असे प्रश्न पडणे सहाजिकच आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Birthday) हे या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
असे केले नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये निवडणूक लढविण्यासाठी शपथपत्र दाखल केले होते. त्यामध्ये त्यांच्या गुंतवणुकीची माहिती समोर आली आहे. त्यांनी कर बचतीसाठी कोणत्या योजनेत किती गुंतवणूक केली याचा तपशील या शपथपत्रात दिला आहे. त्यांनी कोणत्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक केली, ते यावरुन समोर येते.
कर बचतीसाठी LIC मध्ये गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी एलआयसीच्या दोन पॉलिसी खरेदी केल्या आहे. एलआयसीमध्ये त्यांनी 2010 मध्ये गुंतवणूक सुरु केली. त्याचा एकवेळेचा हप्ता 49,665 रुपये आहे. तर दुसरी एलआयसी पॉलिसी 2013 मध्ये सुरु केली आहे. त्या योजनेचा सिंगल प्रीमियम 1,40,682 रुपये आहे. एलआयसी पॉलिसीतील गुंतवणुकीतून त्यांनी बचत केली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसह या योजनांमध्ये कर बचत होते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत पैसा
त्यांनी अल्पबचत योजनांमध्ये, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला दर वर्षी दीड लाखांपर्यंत कर बचत करता येते. पाच वर्षांच्या लॉकइन कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक केल्या जाते. या योजनेत पंतप्रधानांनी आतापर्यंत 23 वेळा गुंतवणूक केली. 2019 मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्याचे मुल्य 7,61,466 रुपये आहे. या योजनेवर 7 टक्के परतावा मिळतो.
कर बचत रोख्यात गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक शपथपत्रात याचा तपशील दिला. त्यानुसार, टॅक्स सेव्हिंग बाँडमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. 2012 मध्ये या गुंतवणुकीचे मूल्य 20 हजार रुपये होते. मार्च 2023 मध्ये टाईम्स नाऊमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार, त्यांनी कोणत्याही रोख्यात गुंतवणूक केलेली नाही. त्यांनी म्युच्युअल फंडात पण गुंतवणूक केलेली नाही. 2019 मध्ये दाखल प्रतिज्ञापत्रात या बचतीचा उल्लेख करण्यात आला आहे.