अहमदाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हीराबेन (Heeraben) मोदी यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत आहेत. हीराबेन 100 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अनुभवांचा आणि घरगुती औषधांतील मास्टरकीचा अनुभव अनेकांना लाभ झाला आहे. हीराबेन कधी शाळेत गेल्या नाहीत, पण उत्तम कलाकार म्हणून त्या लोकप्रिय होत्या.
आर्थिक परिस्थिती बिकट असली तरीही अंगभूत कलात्मकता असल्याने त्यांनी साधं घरही सुंदररितीने सजवलेलं होतं. माती आणि खापराच्या वस्तूंनी त्यांचं घर सजवलेलं असायचं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यात त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त ब्लॉग लिहिला होता. त्यात आईच्या वैशिष्ट्यांबद्दल लिहिलं होतं. हीराबेन यांचे लहान पुत्र पंकज मोदी यांनीही आईबद्दल खूप गोष्टी सांगितल्यात.
नरेंद्र मोदी यांचे वडील दामोदरदास मोदी यांच्या निधनानंतर हीराबेन पंकज मोदी या मुलाच्या घरी रहायला गेल्या होत्या. नंतरही तेथेच राहिल्या. त्यामुळे पंकज मोदी यांचा त्यांना जास्त सहवास लाभला.
पंकज मोदी सांगतात, गुजराती भाषेत बा चा अर्थ आई असा होता. पण ती फक्त आमची आई नव्हती, जगाची जननी होती.
हीराबेन या घरगुती औषधांमध्ये एक्सपर्ट होत्या. लहान-मोठ्या उपचारांसाठी त्या घरातलं मसाल्याचं साहित्य किंवा किचन गार्डनमधल्या औषधी वनस्पतींचा वापर करत असत.
पंकज मोदी सांगतात, वडनगर येथील बहुतांश लोक हीराबेन यांच्याकडे उपचारासाठी येत असत. रोज सकाळपासूनच त्यांच्या घरासमोर रांगा लागत असत.
समाजात ज्या काळात स्पृश्य-अस्पृश्यता पाळली जात होती, तेव्हाही हीराबेन यांनी कधी भेदभाव केला नाही. त्यांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय.
पंकज मोदी ज्या वडनगर भागात रहात होते. तेथे मुस्लिम आणि बहुजनांची लोकसंख्या जास्त होती. पण हीराबेन सगळ्यांना समान मानत असत. धर्मनिरपेक्षतेचे संस्कार हीराबेन यांच्याकडूनच झाल्याचं मोदी सांगतात.