टीव्ही9 भारतवर्षचा विशेष कार्यक्रम 5 एडिटर्समध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पीओकेच्या योजनेविषयी बेधडक मतं माडलं. योग्य वेळ येताच फैसला होईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला धडकी भरणार हे नक्की. पीओके परत येणार असे संपूर्ण देशाला वाटते. काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येईल, हे देशात कोणाला वाटलं होतं? असा सवाल करत त्यांनी पीओकेवर मोदी सरकारचे धोरण काय आहे, हे इशाऱ्यातूनच स्पष्ट केले. पीओके हे भारताचे आहे आणि आम्ही ते घेणारच असे त्यांनी ठणकावले.
नेहरुंमुळे गमावले PoK
जयशंकर म्हणाले की, 1949 मध्ये पंडित नेहरु यांच्यामुळे पीओके पाकिस्तानात गेले. नेहरुंच्या काळातील चुकीचा दोष पीएम मोदींना का? पीओकेची जमीन पाकिस्तानने चीनला दिली. कलम 370 हटविल्यानंतर काश्मीरचे भविष्य बदलले. पीओके भारताचे अविभाज्य भाग आहे. कोणाच्या तरी एका चुकीने ते देशापासून तुटले. पण योग्य वेळ येताच या प्रश्नाचा निकाल लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
थोडी कळ सोसा, वेळ येईल
पाकिस्तानने काश्मीरमध्ये वातावरण बिघडवले. एस. जयशंकर यांना याविषयी विचारण्यात आले. पीओके जरुर परत आणण्यात येईल. तुम्हाला कोणी थांबवले आहे का? 10 वर्षांपासून तुमचे सरकार आहे, मग पीओके भारतात का नाही आले, या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. प्रत्येक गोष्टी, कृतीसाठी एक वेळ येऊ द्यावी लागते. आपली पण तयारी असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटले ना
कोणत्याही पूर्व तयारीशिवाय मोठे पाऊल टाकल्यावर काय होते, हे सर्वांना माहिती आहे. त्यात मोठा धोका पण होऊ शकतो. जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटणार हे कोणाला वाटले होते का? पण किती सोप्या पद्धतीने सर्व गोष्टी झाल्या. त्यासाठी आम्ही अगोदर तयारी केली नाही का? विकासावर लक्ष केंद्रीत केले, एक मॉडल तयार केले. त्याचा लागलीच परिणाम दिसला.
6 महिन्यात PoK भारताचा भाग – CM योगी
तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका निवडणूक प्रचार सभेत पीओकेविषयी मोठे वक्तव्य केले. निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. त्याच्या पुढील 6 महिन्यात PoK भारताचा भाग असेल.