काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यातल्या सुन्तिकोप्पामध्ये एका रियल इस्टेट उद्योजकाचा मृतदेह आढळून आला होता. रमेश वय वर्ष 54 असं मृतदेह आढळून आलेल्या उद्योजकाचं नाव होतं.या उद्योजकाची हत्या तेलंगणामध्ये करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह कर्नाटकमधील सुन्तिकोप्पामध्ये नेऊन जाळण्यात आला होता, आता या हत्येशी संबंधित असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे.8 ऑक्टोबरला सुन्तिकोप्पा परिसरात या उद्योजकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक केली आहे. निहारिक (29) असं मुख्य आरोपीचं नाव असून निखिल आणि हरियाणाचा मुळ रहिवासी असलेला अंकुर याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निहारिक ही रमेश यांची पत्नी असून तीने संपत्तीसाठी त्यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्न झाल्यानंतर तीचे सूर निखिलाशी जुळले, निखिल हा अंकुरचा मित्र होता, या तिघांनी रमेश यांची हत्या करून त्यांची संपत्ती बळकवण्याचा प्लॅन केला.प्लॅनुसार त्यांनी हैदराबादमध्ये रमेश यांची हत्या केली. दोरीने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर संशयीत आरोपींनी कारमध्ये रमेश यांचा मृतदेह ठेवला. त्यानंतर त्यांनी रमेश यांचे पैसे, किमती सामान आणि महत्त्वाची कागदपत्रं घेऊन पोबारा केला.त्यानंतर त्यांनी बंगळुरूमध्ये एका पेट्रोल पंपावर जाऊन वाहनात पेट्रोल भरलं. त्यानंतर ते कोडागू परिसरात आले आणि रमेश यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र सीसीटीव्हीमुळे आरोपींचं भांड फुटलं जिथे मृतदेह जाळण्यात आला होता, त्याच परिसरात काही अंतरावर पोलिसांना एक लाल रंगाची कार आढळून आली. या कारच्या मदतीनं पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत उद्योजकाच्या पत्नीसोबत तिघांना अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.