तिरुनेलवेली : तामिळनाडूतील (Tamil Nadu) तिरुनेलवेली येथे शनिवारी रात्री 300 फूट खोल खाणीत (Mine) अपघात झाला. येथे एक मोठा दगड खाणीत पडल्याने हा अपघात झाला. ज्यात सहा मजूर अडकले. मात्र, खाणीतून दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर अजूनही चार जण तिथे अडकले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुनीर पल्लम भागात एक बोल्डर खाणीत पडला. यानंतर मजुरांचा ट्रक मध्येच अडकला. तर खाणीची रचना अशी आहे की त्यामुळे बचाव कार्यात (Rescue) अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यास आणि सर्व अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला आणखी काही वेळ लागू शकतो.
दक्षिण रेंजचे आयजी आसरा गर्ग म्हणाले की, आम्हाला सुरुवातीला 6 मजूर अडकल्याची बातमी मिळाली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने आतापर्यंत दोन जणांना सुखरूप वाचवले आहे. तर बचावकार्यासाठी लांब हात असलेल्या हेवी ड्युटी क्रेनची आणि विशेषतः डोंगरावर चालण्यात तरबेज लोकांची मदत घेतली जात असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
एनडीआरएफच्या पथकाने या कारवाईबाबत माहिती दिली की, कामगारांना वाचवण्यासाठी सकाळी हेलिकॉप्टर बोलावण्यात आले. आमचे मॉनिटरिंग टीम आतापर्यंतच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यासोबतच आम्ही तामिळनाडू प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. तर खाणीची रचना पाहता सर्व कामगारांना बाहेर काढण्यासाठी थोडा वेळ लागेल हे स्पष्ट आहे. तसेच, खाणीमध्ये फक्त चार किंवा त्याहून अधिक लोक आहेत हे आम्ही आत्ता खात्रीने सांगू शकत नाही, असही आयजी आसरा गर्ग यांनी सांगितलं आहे.
वृत्तानुसार, कामगार अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पण सकाळी एनडीआरएफची चौथी बटालियन घटनास्थळी पोहोचली, त्यात 30 जवानांचा समावेश आहे. सकाळपासून एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे.