नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : INDIA आघाडीचा श्रीगणेशा बिहारमधून सुरु झाला. देशातील विरोधी पक्षांची मोट बांधण्यात नितीश कुमार यांना यश आले. देशातील अनेक लहान-सहान पक्ष एकत्र आले. भाजपशी काडीमोड करत नितीश कुमार यांनी बिहारचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यांना इंडिया आघाडीचेही (INDIA Alliance) नेतृत्व करायचे होते, पण माशी कुठे तरी शिंकली. बंगळुरु नंतर मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आता नितीश कुमार यांचा नूर पालटल्याची चर्चा समोर येत आहे. काँग्रेस आणि राजदने बिहारमध्ये एक खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. नवी दिल्लीत शरद पवार यांच्या घरी बैठक झाली, त्यावेळी पण सर्व काही अलबेल नसल्याचे समोर आले. नितीश कुमार (Nitish Kumar) हे नाराज असल्याचे बातम्या सातत्याने येत आहेत, काय आहे यामागील कारण..
लालू-नितीश कुमार यांच्यात मतभेद
INDIA आघाडीच्या प्रत्येक बैठकीनंतर नितीश कुमार हे या आघाडीतून बाजूला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. राजदच्या सूत्रानुसार, काँग्रेसचा नितीश कुमार यांच्यावर थोडाही विश्वास उरलेला नाही. त्यामुळे प्रत्येक बैठकीत नितीश कुमार वेगळे पडल्याचे चित्र आहे. नितीश कुमार जी20 संमेलनात सहभागी झाल्याने ही दुफळी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. तर रात्रीतूनच पंचायत राज संस्थांना केंद्र सरकारने 2 हजार कोटींचा निधी दिल्याने आगीत तेल ओतल्या गेले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांसाठी हा धक्काच होता.
झाले सतर्क, झाले सावध
नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यात पक्की मैत्री होती. पण काही कारणांमुळे त्यात अविश्वास आल्याचे बोलल्या जात आहे. यापूर्वी राजद आणि जनता दल संयुक्तमध्ये ललन सिंह यांच्याकडे सूत्र होती. पण आता हे केंद्र संजय झा यांच्याकडे सरकले आहे. त्याचा मोठा परिणाम या आघाडीवर दिसून येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जेडीयूचे पारडे झुकत असल्याचे दिसताच काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव सतर्क झाले आहेत.
जेडीयू साईड लाईन
नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल सध्या इंडिया आघाडीत एका कोपऱ्याकडे सरकला आहे. पाटण्यातील बैठकीत लाल प्रसाद यादव यांनी राहुल गांधी यांना इशाऱ्यातच बोहल्यावर चढण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मुंबईतील बैठकीतही त्यांनी राहुल गांधी यांना विरोधकांचा नेता म्हणून जाहीर केले. इंडिया आघाडीचे सुकाणू कोणाच्या हातात जात आहे, हे यावरुन स्पष्ट होत आहे. तर संयुक्त जनता दल साईड लाईन होत आहे.
मुंबईतील बैठकीत बिहारमध्ये काँग्रेसने 10 जागांची मागणी केली. डाव्या पक्षांनी 9 जागांची मागणी केली आहे. तर आरजेडी पण आक्रमक झाली आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन संयुक्त जनता दलाचा इतर पक्षांसोबत तिढा निर्माण होत आहे. काँग्रेससह इतर पक्षांना नितीश कुमार केव्हा पण बदलू शकतात, अशी भीती वाटत आहे.