Gyanvapi Masjid : ज्ञानवापीबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, ओवैसी म्हणाले…

| Updated on: Jul 31, 2023 | 6:52 PM

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या गाजत आहे. हे प्रकरण कोर्टात असताना आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे येत्या काळात हा मुद्दा गाजणार हे अधोरेखित झालं आहे.

Gyanvapi Masjid : ज्ञानवापीबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, ओवैसी म्हणाले...
Gyanvapi Masjid : ज्ञानवापीबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, ओवैसी म्हणाले...
Follow us on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होत आहे. या मंदिराचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात हजर राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्या राम मंदिराचा मुद्दा निवडणुकांमध्ये गाजला होता. अखेर हा मुद्दा निकाली लागला असून भव्य राम मंदिर निर्माण होत आहे. असं असताना अयोध्येनंतर मथुरा आणि काशीबाबत वातावरण तापताना दिसत आहे. प्रकरण न्यायालयात असताना भाजपाने या मुद्द्यात थेट हात घातला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्ञानवापी प्रकरणाबाबत मोठं विधान केलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?

“ज्ञानवापीला मशिद बोललं तर पुन्हा वाद होईल. मला वाटतं देवाने ज्यांना दृष्टी दिली आहे त्यांना कळेल की त्रिशुल मंदिरात काय करतंय. आम्ही तर नाही ठेवलं. ज्योतिर्लिंग आहे. देवांच्या प्रतिमा आहेत. भिंतीही ओरडून सांगत आहे. हे सर्व मुस्लिम समाजाला कळलं पाहीजे की ऐतिहासिक चूक झाली आहे. याचं समाधान होणं गरजेचं आहे.”, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

“मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की, अलाहाबाद हायकोर्टमध्ये एसआयच्या रिपोर्टवर निर्णय घेणार आहे. त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं आहे. हा एक प्रकारचा दबाव आहे. ज्या ठिकाणी 400 वर्षांपासून मशिद आहे. त्यांनी कायद्याचं पालन केलं पाहीजे.”, असंही असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितलं.

ज्ञानवापी प्रकरण कोर्टात

काशीच्या ज्ञानवापी प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सर्व्हे करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी मुस्लिम पक्षाने हायकोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने 3 ऑगस्टपर्यंत सर्व्हे करण्यास मनाई केली आहे. पण 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा गाजणार हे नक्की झालं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे.

2024 निवडणुकांसाठी एक वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्ली आहे. भाजपाला घेरण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. यासाठी आतापासून जोर बैठका सुरु झाल्या आहेत. या आघाडीला इंडिया असं नावंही देण्यात आलं आहे. दुसरीकडे, भाजपाही हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडण्याच्या तयारीत असल्याचं दिस आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याकडे याच पार्श्वभूमीने पाहिलं जात आहे.