पूजा खेडकर यांना यापुढे यूपीएससीच्या सर्व परीक्षा देण्यास बंदी; यूपीएससीचा मोठा निर्णय

| Updated on: Jul 31, 2024 | 4:25 PM

Pooja Khedkar Case Update : वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. सातत्याने या प्रकरणात नवे अपडेट्स समोर येत आहेत. आता यूपीएससीकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांनायापुढे यूपीएससीच्या सर्व परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाचा...

पूजा खेडकर यांना यापुढे यूपीएससीच्या सर्व परीक्षा देण्यास बंदी; यूपीएससीचा मोठा निर्णय
पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट
Image Credit source: tv9
Follow us on

वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांना यूपीएससीने मोठा धक्का दिला आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. भविष्यात सर्व परीक्षा आणि निवडीमधून त्यांना काढून टाकलं आहे. नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर दोषी आढळल्यानंतर नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार दोषीकरार अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांची आयएएसपदाची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. आज पूजा खेडकर यांच्यावतीने कोर्टात हा बचावाचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यात अजून यूपीएससीने दोषी ठरवलेले नाही. यूपीएससीने आज दुपारपर्यंत त्यांचं म्हणणं मांडायला पूजा खेडकर यांना वेळ दिला होता.

पूजा खेडकर यांच्यावर कठोर कारवाई

यूपीएससीकडून पूजा खेडकर यांच्या उपलब्ध कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी केली. यात पूजा खेडकर दोषी आढळल्या. सीएसई 2022 च्या नियमांच्या तरतुदींचं पूजा खेडकर यांनी उल्लंघन केलं असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांची सीएसई 2022 साठीची प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. याचसोबत पूजा खेडकर यांना यूपीएससीच्या सर्व भविष्यातील परीक्षा आणि निवडीसाठी कायमस्वरूपी वंचित ठेवण्यात आलं आहे.

प्रकरण नेमकं काय आहे?

यूपीएससी परिक्षेत पूजा खेडकर यांना 841 रँक मिळवला होता. त्यानंतर त्यांची आयएएसपदी नियुक्ती झाली. पुण्यात त्यांचं प्रोबेशन (प्रशिक्षण) सुरु होतं. प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना सरकारी सोयी- सुविधा मिळाव्यात अशी मागणी पूजा खेडकर यांनी केली होती. शिवाय कोट्यावधींची संपत्ती असताना पूजा खेडकर यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतला.

ओबीसी कोट्यातून त्या आयएएस झाल्या. याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा दिली. पूजा खेडकर यांनी त्यांच्या वैयक्तिक ऑडी कारला लाल-निळा दिवा लावला होता. ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्डही त्यांनी गाडीवर लावला होता. या सगळ्यामुळे पूजा खेडकर अडचणीत आल्या. आता यूपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.