उत्तर प्रदेश | 5 डिसेंबर 2023 : देशातील बहुचर्चित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील या नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या भक्तीभावात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख यजमान म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम 22 जानेवारीला असला तरी 16 जानेवारीपासूनच विधीनुसार पूजेची प्रक्रिया सुरू होणार आहे. काशीचे अभ्यासक पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व विधी होणार आहेत.
अयोध्येच्या राम मंदिरात 16 जानेवारीपासून विधीनुसार पूजेची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. पूजेसाठी मुख्य मंदिरासमोरील जागा निश्चित करण्यात आली आहे. येथे प्रत्येकी 45 फुटांचे दोन मंडप बांधण्यात येणार आहेत. सध्या मंडप बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे एक यज्ञकुंड बांधला जाणार आहे. यामध्ये आणखी 9 विशेष हवनकुंड बांधले जाणार आहेत.
अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला होता. त्या विधीचे अध्यक्षपद हे काशीचे अभ्यासक पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्याकडे होते. त्यांच्याकडेच संपूर्ण प्राणप्रतिष्ठेच्या पूजेचे अध्यक्षस्थान सोपविण्यात आले आहे. १ डिसेंबरला पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी अयोध्येतील धार्मिक स्थळी भेट देत कार्यक्रमाच्या सूचना दिल्या.
काशीचे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित आणि त्यांचे पुत्र अरुण दीक्षित हे या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा पुजेसाठी 2 मंडप, 9 हवनकुंड त्याचसोबत तलाव बांधण्यात येणार आहेत. ही सर्व कामे 10 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. देशभरातील विविध शाखांचे 121 ब्राह्मण ही पूजा करणार आहेत. यात काशीतील सुमारे 40 विद्वानांचा समावेश असेल अशी माहिती पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दिली.
गणेशपूजा, रामपूजा या सर्व पूजा एकाच मंडपात होणार आहेत. तर, दुसऱ्या छोट्या मंडपामध्ये प्रभू रामाच्या मूर्तीचे सर्व विधी पार पाडले जातील. ज्यामध्ये १०० कलश, अन्नाधिवास आणि जलाधिवास स्नान करण्यात येणार आहे. भारतातील सर्व राज्यांतून सर्व शाखांचे विद्वान यांना आमंत्रित केले जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
संपूर्ण भारतातील १२१ उच्चपदस्थ ब्राह्मण पूजा करतील असा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. यामध्ये सर्व वेदांच्या अभ्यासकांचा समावेश असेल. प्राण प्रतिष्ठाशी संबंधित पूजा 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ट्रस्टने नियुक्त केलेली व्यक्ती मुख्य यजमान असेल. तर, मुख्य पूजेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 जानेवारीला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठामध्ये यजमानाची भूमिका बजावणार आहेत, अशी माहिती अरुण दीक्षित यांनी दिली.