नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : अयोध्येत रामललाच्या अभिषेकपूर्वी देशात भक्तिमय वातावरण आहे. दरम्यान, काही विरोधी नेत्यांची वक्तृत्वबाजीही सुरू आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांना सूचनावजा आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना जास्तीत जास्त स्थानिक लोकांना अयोध्येला पाठवण्यावर भर देण्यास सांगितले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना या सूचना दिल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. राम मंदिर येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत हा भाजपचा कार्यक्रम असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधक जरी चिथावणी देत असले तरी मंत्री आणि नेत्यांनी संयम दाखवा. कॅबिनेट मंत्र्यांनी कठोर वक्तव्ये करू नये. अयोध्येबाबत विश्वास दाखवा आणि राग टाळा, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.
पंतप्रधान म्हणाले, ‘अयोध्येवर विश्वास दाखवा आणि राग टाळा. एवढेच नाही तर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना स्थानिक लोकांना अयोध्येत पाठवण्यावर भर देण्यास सांगितले आहे. देश रामोत्सव साजरा करत आहे. अशावेळी विरोधक आपल्या वक्तव्याने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नका. प्रति आक्रमकता दाखवू नका. तसेच, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत सतर्क राहण्याचेही त्यांनी सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राम मंदिर येथील रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावेळी आणि त्या दरम्यानच्या काळात पक्षाचे झेंडे आणि बॅनर वापरू नयेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सर्व नेत्यांना आधीच सांगितले आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकासाठी सुरू असलेल्या तयारी दरम्यान भाजपला विरोधकांसोबत कोणत्याही वादात पडायचे नाही त्यासाठीच मोदी यांनी हा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, मंत्र्यांनी विश्वास दाखवावा आणि सजावटीबाबतही तेवढीच काळजी घ्यावी. प्रत्येकाने आपापल्या भागात अभिषेक करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे ही लक्षात ठेवावे. तसेच, तुमच्या भागातील लोकांना 22 जानेवारीनंतर अयोध्येत घेऊन या. राम ललाचे दर्शन घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना श्री रामाचा आशीर्वाद घ्या.
दरम्यान, 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने घेतला आहे. रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक महत्वाचे नेते, संत महंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. याचा मुलांना त्रास होऊ नये यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.