पंतप्रधान मोदी कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ने सन्मानित

| Updated on: Dec 22, 2024 | 6:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर'देऊन सन्मानित करण्यात आलं.

पंतप्रधान मोदी कुवेतचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीरने सन्मानित
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’देऊन सन्मानित करण्यात आलं. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांनी पंतप्रधान मोदींना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं.

हा कोणत्याही राष्ट्राकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला गेलेला विसावा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.’द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा कुवेतचा नाइटहूड ऑर्डर आहे. हा सन्मान एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला किंवा दुसऱ्या देशाच्या राजघराण्यातील व्यक्तीला मैत्रीचं प्रतीक म्हणून दिला जातो.यापूर्वी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांना हा सन्मान कुवेतकडून देण्यात आला आहे. त्यानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

 

पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. रविवारी मोदी कुवेतच्या बायन पॅलेसमध्ये पोहोचले, यावेळी कुवेतचे पंतप्रधान शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत केलं तसेच त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्यासोबत दोन देशांमध्ये असलेल्या व्यापारी संबंधांबाबत चर्चा केली.या भेटीदरम्यान कुवेत आणि भारतामध्ये असलेल्या व्यापारी संबंधांना अधिक बळकटी देण्यावर दोन्ही नेत्यांकडून जोर देण्यात आला. तसेच ऊर्जा आणि आर्थिक गुंतवणुकीसारख्या विषयांवर देखील यावेळी चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दैऱ्यावर आहेत, ते शनिवारी कुवेतमध्ये पोहोचले. भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीचा हा पहिलाच कुवेत दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी कुवेतचा दौरा केला नव्हता.