तेलंगणा | 27 नोव्हेंबर 2023 : तेलंगणा विधानसभेच्या निवडणूकीसाठी गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी मतदान आहे. निवडणूकांचा प्रचार थांबण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा तेलंगणात आहेत. प्रचार सभांना जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुमला येथील भगवान वेंकेटश्वराची सांग्रसंगीत विशेष पूजा केली. मोदी यांनी दक्षिण भारतीय पेहराव करीत या पूजेत सहभाग घेतला. यानंतर पंतप्रधान दोन सभांना संबोधित करणार आहेत. तर सायंकाळी हैदराबाद येथे रोड शो करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तिरुपती बालाजीच्या दरबारात जाऊन तेलंगणाच्या निवडणूकीचे गणित साधल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री विशेष विमानाने तिरुपती विमानतळावर पोहचले आणि त्यानंतर सोमवारी सकाळी तिरुमाला मंदिरात पोहचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोतर आणि गळ्यात उपरणं घालून या पुजेत सहभाग घेतला. त्यांनी व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले आणि मंदिरात काही वेळ व्यतित केला. व्यंकटेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर पुजाऱ्यांचा आशीर्वाद आणि प्रसाद घेतला. बालाजीच्या दर्शनानंतर पंतप्रधान तेलंगणात भाजपाच्या प्रचारासाठी उतरणार आहेत. दक्षिणेतील राज्यात पुन्हा हिंदुत्वाच्या नावाने प्रचार करण्याची ही रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी चौथ्यांदा तिरुपती बालाजीच्या दरबारात दर्शनासाठी पोहचले आहेत. 2014 मध्ये पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर 2015 मध्ये त्यांनी तिरुपतीला जाऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी तेथे दर्शन घेत पूजा घातली होती. साल 2019 मध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर बालाजीच्या चरणी माथा टेकवला होता. तेलंगणा निवणूकीची रणधुमाळी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा भगवान व्यंकटेश्वराची पूजा घातली आहे. तिरुपतीपासून तेलंगणाच्या निवडणूकीची राजकीय रणनीती भाजपाने आखली आहे.
उत्तर भारताच्या राजकारणात हिंदुत्वाचं नाणं खणखणीत वाजत. परंतू आता दक्षिण भारतात देखील आता हिंदूत्वाची रणनीती आखली जात आहे. भाजपाने हिंदीपट्ट्यातील हिंदुत्वाचं कार्ड आता दक्षिणेतील तेलंगणा राज्यात आणलं आहे. त्यामुळे भाजपाने तेलंगणात एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिलेले नाही आणि सत्तेत येताच मुस्लीमांचे चार टक्के आरक्षण रद्द करण्याचं वचन भाजपाने दिले आहे. भाजपाने तेलंगणाच्या निवडणूकीत राम मंदिराचं दर्शन जनतेला मोफत करण्याचं वचन दिले आहे. अमित शाह यांनी आपल्या रॅलीत भाजपाचं सरकार आले तर राम दर्शन मोफत मिळेल असे म्हटले होते. तिरुपती मंदिर जरी आंध्रप्रदेशात येत असले तरी तेलंगणा एकेकाळी आंध्रप्रदेशचा हिस्सा होता. त्यामुळे तेलंगणाच्या लोकांना तिरुपतीबद्दल आस्था आहे. आणि राज्यातील सर्व मंदिरांचा जीर्णोध्दार आणि कारभार या मंदिरामार्फत होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती दर्शनानंतर महबूबाबाद आणि करीमनगर येथील सभांना संबोधीत करणार आहेत. यानंतर सायंकाळी पाच वाजता हैदराबाद येथे ते मेगा रोड शोमध्ये सामील होतीस. भाजप हैदराबाद मनपा निवडणूकीत दुसरा मोठा पक्ष बनली आहे. केसीआर यांची पार्टी बीआरएसला भाजपाने त्यावेळी मोठी टक्कर दिली होती. त्यावेळी अमित शाह यांच्यापासून योगी आदित्यनाथ हे हैदराबादमध्ये रोड शोसाठी त्यावेळी आले होते. आता विधानसभा प्रचारात थेट पंतप्रधान मोदी यांना उतरवून निवडूका जिंकण्याची योजना आहे.
तेलंगणात गेल्या निवडणूकांत भाजपाला ज्या जागा मिळाल्यात त्यावरुन किंगमेकर बनविण्याच्या भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणूकात भाजपाला केवळ एक जागा मिळाली होती. गोशामहल येथून टी. राजा सिंह निवडणूक जिंकले होते. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला संजिवनी मिळाली. पक्षाने 19.65 टक्के मते मिळविली आणि चार लोकसभा सीट जिंकल्या होत्या. 2018 मध्ये भाजपाला 6.98 टक्के मते होती. लोकसभेनंतर भाजपाने रणनीती बदलली आणि केसीआर यांच्याशी राजकीय मैत्री संपविली. 2020 ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडणूकांत भाजपाने 48 जागा मिळविल्या. आणि आता विधानसभा निवडणूकांत कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजपा सिद्ध झाली आहे.