नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बंगळुरू (Bengluru) येथील ९ वीत शिकणाऱ्या आदित्यची खूप तारीफ केली आहे. त्याचं पूर्ण नाव आदित्य दीपक अवधानी. मोदींनी सोशल मीडियावर त्याचं कौतुक केल्याचं ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होतंय. खुद्द मोदींनी स्तुती केलीय म्हणजे नक्कीच या विद्यार्थ्याने मोठं काम केलं असेल. वापरलेल्या वह्यांमधील कोरे कागद वाया जाऊ नयेत, यासाठी आदित्यने एक शक्कल लढवली आहे. बंगळुरू येथील सीनियर इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी ट्विटरवर स्वतःच्या मुलाची एक चांगली सवय सांगितली. दरवर्षी शैक्षणिक वर्ष संपलं की आदित्य त्याच्या जुन्या वह्यांचे कोरे कागद काढतो. त्यांना बाइंड करतो. बाइंडिंग केलेल्या या वहीचा नव्या वर्षात वापर करतो. डॉ. दीपक यांचा मुलगा आदित्य दीपक अवधानी दीन अकॅडमीचा विद्यार्थी आहे.
डॉ. दीपक यांनी एक फोटो शेअर केलाय. त्यात टेबलवर कागदांचा ढीग पडलेला दिसतोय. त्यात त्यांनी लिहिलय, दरवर्षी शैक्षणिक वर्ष संपलं की मुलगा मेहनतीचे वह्यांमधले कोरे कागद काढतो. मी त्यापासून वही बनवून देतो. रफ वर्क आणि प्रॅक्टिससाठी या वह्यांचा वापर करतो… ही पोस्ट तत्काळ व्हायरल झाली. पर्यावरण प्रेमींनी आदित्य आणि डॉ. दीपक यांचं कौतुक केलं. असंख्य लोकांनी ती शेअर केली. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतही ती गेली.
Every academic year end, son diligently takes out empty sheets of paper from his notebooks and I get them bound. Used for rough work and practice. #ReduceRecycleReuse pic.twitter.com/8E5RRQz6Sq
— Dr Deepak Krishnamurthy (@DrDeepakKrishn1) March 5, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या ट्विटला रिट्विट केलं. त्यात लिहिलंय, हा एक चांगला प्रयत्न आहे. शाश्वत जीवनाचा एक मोठा संदेश यातून मिळतोय. आदित्य आणि त्याच्या वडिलांना खूप खूप शुभेच्छा.. असे प्रयत्न इतरांनीही करावे. रिसायकलिंग आणि ‘कचऱ्यातून धन’मिळवण्यासाठी जागरूकता निर्माण होईल.
आदित्यने या कौतुकाला उत्तर दिलंय. तो म्हणाला, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. दरवर्षी उन्हाळ्यात शाळेला सुट्या लागल्या की आई आणि मी एकत्र बसतो. प्रत्येक वहीतून कोरी पानं काढतो. ते स्पायरल बाइंडिंगसाठी देतो. गणित आणि रफ वर्कसाठी मी त्यांचा वापर करतो. कोणतीही वस्तू फेकून देण्यापूर्वी त्याचा पु्न्हा वापर होऊ शकतो का, याविषयी आपण विचार केला पाहिजे…
आदित्यची आई म्हणाली, माझ्या वडिलांनी मला लहानपणी ही सवय लावली होती. लहानपणीच माझ्या मुलाला मी हा वारसा दिला. आता पुढच्या पिढीनेही ही सवय घेतली तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा खूप मोठा प्रयत्न ठरू शकतो.