पुढील पाच वर्षे गरीबांना मोफत धान्य मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

| Updated on: Nov 04, 2023 | 10:23 PM

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीब नागरीकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाते. या योजनेला कोरोनाकाळात सुरु करण्यात आले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला येत्या पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे.

पुढील पाच वर्षे गरीबांना मोफत धान्य मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Image Credit source: socialmedia
Follow us on

छत्तीसगढ | 4 नोव्हेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगढ येथील दुर्गमध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सभेत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ( PMGKAY ) नूसार येणाऱ्या पाच वर्षांत गरीबांना मोफत धान्य देण्याच्या निर्णयाची घोषणा त्यांनी केली आहे. या घोषणेमुळे देशातील 80 कोटीहून अधिक नागरिकांना रेशनिंगवर मोफत धान्य मिळणार आहे. येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आम्ही निश्चिय केला आहे. देशातील 80 कोटी गरीबांना मोफत धान्य देणाऱ्या योजनेला भाजपा सरकार येत्या पाच वर्षांसाठी मुदतवाढ देत आहे. जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम मला असे पवित्र निर्णय घेण्याची प्रेरणा देते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीब नागरीकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाते. या योजनेची घोषणा 30 जून 2020 रोजी झाली होती. त्यानंतर या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने आधी डिसेंबर 2023 पर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेला पुन्हा पाच वर्षांची मुदतवाढ दिली आहे.

कोरोना काळात सुरुवात

कोरोना साथीनंतर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची सुरूवात केली होती. कोरोना साथीनंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी अनेक कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. हातावरचे पोट असणाऱ्यांना विशेषत: गरिबांचे उपासमारीमुळे प्रचंड हाल झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील 80 कोटी गरीबांच्या मदतीसाठी मोफत रेशन योजना सुरू केली होती.

काय आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजना ?

पंतप्रधान गरीब कल्याण योजना/ पॅकेज गरीबांसाठी 1.70 लाख कोटीची व्यापक मदत योजना आहे. ही योजना कोरोनाकाळात गरीबांच्या मदतीसाठी जाहीर केली होती. या योजनेची घोषणा मार्च 2020 रोजी झाली होती. त्यामुळे गरीबांना तातडीने आर्थिक आणि अन्न मदत मिळाली.