पंजाब | 15 ऑक्टोबर 2023 : सैन्यात तरुणांसाठी ‘अग्निवीर भरती’ सुरु झाली असली त्यामागील भयानक सत्य उघड झाले आहे. या योजनेत भरती झालेला पंजाबचा जवान अमृतपाल सिंह हा 19 वर्षी शहीद झाल्यानंतर त्याचा मृतदेहाला खाजगी एम्ब्युलन्सने पाठविले. तसेच त्याच्या पार्थिवाला त्याच्या बहिणींना खांदा द्यावा लागल्याने केंद्र सरकारवर विरोधी पक्ष आणि पंजाब सरकारने टीका केली आहे. अग्निवीर योजनेत भरती झालेले जवान शहीद नाहीत का असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, या जवानाला ‘गार्ड ऑफ ऑनर’ न देण्यामागे सरकारने कारण सांगितले आहे.
अग्निवीर योजनेत तरुणांना देशाच्या सेवेसाठी भरती केले जात आहे. परंतू या योजनेतून भरती झालेला आणि पहिला शहीद ठरलेल्या पंजाबच्या अमृतपाल सिंह ( वय 19 ) याचा मृतदेह खाजगी एम्ब्युलन्सने पंजाबच्या त्यांच्या घरी पाठविण्यात आले. त्यांना कोणतेही गार्ड ऑफ ऑनर दिले नाही. त्यामुळे शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम मजीठीया यांनी शहीदाला सन्मान न दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता ही योजनाच रद्द करुन आतापर्यंत भरती केलेल्या अग्निवीरांना कायम स्वरुपी सैन्यात भरती करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने या घटनेला दुर्दैवी म्हटले आहे. परंतू अमृतपाल याचा मृत्यू राजौरी सेक्टरमध्ये ड्यूटी करताना चुकून स्वत:च्या बंदुकीची गोळी लागल्याने झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची कोर्ट ऑफ इन्वायरी सुरु असून त्यातून खरी बाब उलगडेल असे म्हटले आहे.
अग्निवीर अमृतपाल सिंह याचा 11 ऑक्टोबर रोजी जम्मू – कश्मीर येथे ऑन ड्यूटी गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खाजगी एम्ब्युलन्समधून घरी पाठविण्यात आला होता. तसेच सैन्यातर्फे कोणतीही मानवंदना देण्यात आली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता केंद्र सरकार टीका केली आहे. शहीदांप्रती सैन्याने कोणताही निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारने त्यास शहीदाचा दर्जा देत सैनिकाच्या कुटुंबियांनी एक कोटी रुपायांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक्स पोस्ट टाकीत म्हटले आहे.