पंजाब : तरनतारन येथील एका पोलीस स्थानकावर मोठा हल्ला करण्यात आला. रॉकेट लॉन्चर वापरुन पोलीस स्थानक उडवून देण्याचा काही जणांचा इरादा होता. या हल्लात पोलीस स्थानकाच्या इमारतीचं नुकसान झालं. रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. रात्रीच्या वेळी पोलीस स्थानकात फारसं कुणी नव्हतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र हाच हल्ला दिवसा झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असला, अशी भीती व्यक्त केली जातेय. अमृतसर-बठिंडा हायवेवर असलेल्या सरहाली पोलीस स्थानकावर झालेल्या या हल्ल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
रॉकेट पोलीस ठाण्याच्या बाहेरच्या बाजूने आत फेकण्यात आलं. रॉकेट हल्ल्यामुळे पोलीस स्थानकाच्या खिडकीच्या काचा फुटल्या. पण कोणीही जखमी झालं नाही. तरनतारन पोलिसांनीही या हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिलाय. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याचं सांगितलं जातंय.
रॉकेट गेटवर आदळलं गेलं, त्यामुळे पोलीस स्थानकाच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं नाही. तरनतारन इथं पोलिसांनी एक सुविधा केंद्र सुरु केलं होतं. या सुविधा केंद्राच्या पोलीस स्थानकाच्या इमारतीवर रॉकेट लॉन्चरने हल्ला करण्यात आला.
खलिस्तानी समर्थकांनी हा हल्ला केल्याची शंका व्यक्त केली जाते आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशाऱ्यावरुन खलिस्तानी समर्थकांनी एकत्र येत हा हल्ला केला असावा, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.
हा हल्ला अतिरेकी हरविंदर सिंह उर्फ रिंद याच्या गावात करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच रिंदाचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण सोशल मीडियातून रिंदा अजूनही जिवंत असल्याच्या काही पोस्टही समोर आल्या होत्या.
आता पंजाबमध्ये चक्क रॉकेट लॉन्चर वापरुन पोलीस ठाणं टार्गेट करण्यात आल्यानं सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पंजाबमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. हा हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. तसंच भारतीय गुप्तचर यंत्रणाही अलर्ट झाल्यात.