बांग्लादेशी नागरिकांना नकली कागदपत्रांआधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देत त्यांना परदेशात पाठविण्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे टूर्स एण्ड ट्रॅव्हल एजन्सी मार्फत हे रॅकेट चालायचे. या ‘टुर्स एण्ड ट्रॅव्हल्स’ कंपनीच्या माध्यमातून या आरोपीने आतापर्यंत १०० बांग्लादेशींना भारतीय पासपोर्ट देऊन परदेशात त्यांची पाठवणूक केली आहे. या प्रकरणात मास्टरमाईंड मनोज गुप्ता याला अटक झाली असून या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या सात इतकी आहे.
मनोज गुप्ता बनावट कागदपत्रांआधारे भारतीय पासपोर्ट तयार करायचा. त्याबदल्यात त्याला लाखो रुपयांची कमाई होत होती. या टोळीत समरेश आणि अन्य साथीदार त्याची मदत करायचे. शनिवारी मनोज गुप्ता याला प. बंगाल पोलिसांनी अटक करुन अलीपूर कोर्टात हजर केले आहे. कोर्टाने त्याला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प. बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील गायघाटा पोलीस स्टेशन क्षेत्रातील चांदपाडा मोतीलाल गुप्ता रोड येथील कार्यालयातून आरोपी मनोज गुप्ता आपले रॅकेट चालवित होता. समरेश आणि अन्य साथीदार मदत करायचे त्यानंतर भारतीय पासपोर्ट तयार केला जायचा. आणि बांग्लादेशी नागरिकांना भारतीय नागरिक बनविले जात होते. त्यानंतर टुर एंड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या माध्यमातून त्यांना परदेशात पाठवले जायचे. याआधी कोलकाता पोलिसांनी दीपांकर दास नावाच्या व्यक्तीला दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून अटक झाली होती.
आरोपी बांगलादेशींकडून ५ ते १० हजार रुपये घ्यायचा आणि त्यांना आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवून द्यायचा. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत सामील करायचा. त्यानंतर खोट्या पत्त्याआधारे त्यांना पासपोर्टसाठी अर्ज करायचा. जेव्हा हे पासपोर्ट पोस्टाने यायचे तेव्हा पोस्ट ऑफीस कार्यालयातील माणसांना मॅनेज करुन ते मिळवायचा. आणि बांग्लादेशी नागरिकांकडून पाच लाख रुपये यासाठी आकारले जायचे असे सूत्रांनी सांगितले.
या महिन्याच्या सुरुवातीला बनावट पासपोर्टचे प्रकरण उघड झाले होते. कोलकाता पोलिसांनी टपाल विभागाच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याला दक्षिण २४ परगणामधील बेहाला येथील पर्णश्री परिसरातून अटक केली होती. त्याआधी पोलिसांनी उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून दोघांना अटक केली होती. आरोपींकडून हार्ड डिस्क ड्राइव्ह, एक संगणक, अनेक बनावट कागदपत्रे आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.