नवी दिल्ली | बजाज ऑटोच्या वाहनांना घरा-घरात पोहोचवणाऱ्या राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज 83 व्या वर्षी निधन झाले. तब्बल पाच दशके बजाज ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये (Bajaj Group) नेतृत्व करणाऱ्या राहुल बजाज यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. आज पुण्यात त्यांचं निधन झालं. खंबीर नेतृत्व आणि सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राहुल बजाज यांचे अनेक किस्से ख्यात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना त्यांनी एक थेट प्रश्न विचारला होता. 30 नोव्हेंबर 2019 साली मुंबईत पार पडलेल्या Economic Times Awards कार्यक्रमात त्यांनी अमित शाह यांना अतिशय तिखट प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देणं अमित शाह यांनाही जड गेलं. त्यानंतर कित्येक दिवस त्यांच्या या प्रश्नावर राजकीय आणि उद्योग जगतात चर्चा झाल्या.
2019 साली मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज उभे राहिले आणि माइक हातात घेऊन अमित शाह यांना म्हणाले, मी तुमच्याकडून चांगल्या उत्तराची अपेक्षा करतोय. कदाचित मी जो आरोप करतोय, तो चुकीचा असेल, पण माझ्यासारखे अनेक लोक हे बोलतायत. UPA च्या काळात सरकारला टीका करण्याचं स्वातंत्र्य होतं. आम्ही कुणालाही शिव्या देऊ शकत होतो. पण आता तुम्ही चांगलं काम करत असूनही आम्हाला तुमच्यावर टीका का करू शकत नाहीत? तसा आत्मविश्वासच आमच्यात का राहिला नाही, कदाचित मी चुकीचा असेन, पण आम्हाला सगळ्यांनाच हे वाटतंय. अशी स्थिती का आहे? असा प्रश्न राहुल बजाज यांनी विचारला होता.
2019 साली राहुल बजाज यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा व्हिडिओ-
राहुल बजाज यांनी विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देणं कदाचित अमित शाह यांनाही जड गेलं असावं. पण त्यांनी त्यांच्या खास शैलीत याला उत्तर दिलं. अमित शाह म्हणाले, ‘ तुम्ही असा विचारल्यानंतर कुणाला वाटणार नाही की, लोक आमच्या सरकारला प्रश्न विचारू शकत नाहीत.’ हे पहिलं वाक्य ऐकूनच राहुल बजाज यांनी टाळ्या वाजवून यावर प्रतिक्रिया नोंदवली. अमित शाह पुढे म्हणाले, ‘देशात कुठल्याही प्रकारचं भीतीचं वातावरण नाही. कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. ही केवळ एक हवा बनवण्यात आली आहे. खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावर पक्ष अध्यक्ष या नात्याने मी आणि राजनाथ सिंह यांनी याची निंदा केली आहे. त्यावर कारवाईही केली. त्यानंतर संसदेत त्यांनी याबद्दल माफीही मागितली आहे.’
कुणालाही घाबरण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी आणि सरकारवर अनेक वृत्तपत्रांनी लिहिलेलं आहे आणि अजूनही लिहित आहेत. सर्वात जास्त कुणाच्या विरोधी लिहिलं असेल तर आमच्या विरोधात लिहिलं आहे. तरीही एक भीतीचं वातावरण बनलय, असं तुम्हाला म्हणायचं असेल तर आम्ही ते बदलण्याचा प्रयत्न करू. सगळे बोलतात, संसदेतही बोलतात. कुणी घाबरायची गरज नाही. कुणी बोललं तर सरकारला त्याची चिंता होईल, असंही काही नाही. हे सरकार अत्यंत पारदर्शी असून आम्हाला कोणत्याही प्रकारच्या विरोधाची भीती नाही. कुणी विरोध केलाच तर आम्ही स्वतःत सुधारणा करण्याचा प्रयत्न करू.’
इतर बातम्या-