18 व्या लकोसभेच्या पहिल्या सत्रातील आज तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसात अनेक खासदारांचा शपथविधी पार पडला. लोकसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओम बिर्ला तर इंडिया आघाडीने काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांना मैदानात उतरवले. आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदासाठी निवड झाली. भाजपकडून दुसऱ्यांदा या पदावर निवड होणारे बिर्ला हे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्या भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
राहुल गांधी यांचे पंतप्रधानांशी हस्तांदोलन
राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यावर ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यांना त्यांच्या आसन व्यवस्थेपर्यंत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि संसदीय कार्यमंत्री रिजिजू होते. यावेळी राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक काळात एकमेकांवर तुफान हल्लाबोल केला होता.
विरोधक भारताचा आवाज
यावेळी राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना अभिनंदन करताना इशाऱ्यातून सरकारवर पण हल्लाबोल केला. आज सरकारकडे बहुमत आहे. संख्याबळ आहे. पण विरोधक, इंडिया आघाडी हे जनतेचा आवाज असल्याचे ते म्हणाले. संख्याबळावर विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. मला आशा आहे की, लोकसभा अध्यक्ष जनतेचा आवाज लोकसभेत उठवू देतील. विरोधकांचा आवाज दाबणे हे लोकशाहीविरोधी असल्याचे ते म्हणाले. त्यांना चूप बसवून संसदे चालवू शकत नाही. विरोधक सरकारसोबत सहकार्य करु इच्छित आहे. पण आम्हाला बोलण्याची संधी, आमची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी असे त्यांनी स्पष्ट केले.
आता विरोधक मजबूत
इंडिया आघाडी, विरोधक हे भारताचा आवाज आहेत आणि यावेळी विरोधक मजबूत स्थिती असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी मारलेली मुसंडी या आधारे त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यामुळे येत्या काळात लोकसभेत अनेक मुद्यांवर विरोधक आणि सरकारमध्ये ताणा-ताणी होणार हे आतापासूनच स्पष्ट झाले आहे. तर सरकारसोबत सहकार्य करण्याचे धोरण असल्याचे पण राहुल गांधी यांनी सांगितले आहे.