नवी दिल्ली | देशातील LIC, SBI, EPFO मधील गुंतवणूक अदानींकडे वळती केली जातेय, मात्र यावरून कोणतीही चौकशी होत नाहीये ना खुलासा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एवढी कशाची भीती आहे, असा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या दाव्याच्या आधारे राहुल गांधी यांनी मोदींविरोधात ट्विट केलंय. वृत्तानुसार, ईपीएफओ सबक्राइबरदेखील अदानींच्या दोन शेअर्सचे कॅप्टिव्ह गुंतवणूकदार आहेत. हाच धागा पकडत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधानांना सवाल केलाय. लोकांच्या निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जातोय? ‘मोडानी’चा पर्दाफाश झाल्यानंतरही हे का घडतंय? पंतप्रधानजी, न जांच… न जवाब… इतना डर क्यों है?
LIC की पूंजी, अडानी को!
SBI की पूंजी, अडानी को!
EPFO की पूंजी भी, अडानी को!‘मोडानी’ के खुलासे के बाद भी, जनता के रिटायरमेंट का पैसा अडानी की कंपनियों में निवेश क्यों किया जा रहा है?
प्रधानमंत्री जी, न जांच, न जवाब! आख़िर इतना डर क्यों?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 27, 2023
एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, EPFO चे बहुतांश भांडवल निफ्टी ५० शेअर्संमध्ये गुंतवले जाते. यात अदानी इंटरप्राइज आणि अदानी पोर्ट्स अँड एसईझेड यांचा समावेश आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भाजपवर अधिक आक्रमकपणे टीका सुरु केली आहे. अदानी यांचा नरेंद्र मोदींसोबत काय संबंध आहे? मला या लोकांची भीती वाटत नाही. माझं सदस्यत्व रद्द करून, धमकावून, तुरुंगात टाकून माझं तोंड बंद करू शकतात, असं या लोकांना वाटतं. मात्र मी भारताच्या लोकशाहीसाठी लढतोय आणि लढत राहणार, असा इशारा राहुल गांधी यांनी दिलाय.
मी संसदेत असेन किंवा नसेन, याने काहीही फरक पडणार नाही. मला माझी साधना सुरु ठेवायची आहे. मी करुन दाखवेन. त्यांनी मारहाण करो वा तुरुंगात टाको. माझी तपस्या सुरु राहील. पंतप्रधानांना मी एक साधा प्रश्न केलाय, त्यावरून हा सगळा खेळ सुरु आहे. अदानींच्या शेल कंपन्यांत २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा माझा प्रश्न आहे, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून केलाय.