नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांची ईडीकडून चौकशी सुरु झाल्यापासून देशातील राजकारणात नवनव्या घडामोडी घडत आहेत. राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी ईडी (ED) चौकशी सुरु असून गेल्या तीन दिवसांपासून तब्बल 30 तास चौकशी करण्यात आली आहे. ईडीकडून ही चौकशी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी काल रात्री ईडीच्या अधिकाऱ्यांना आपल्याला गुरुवारी चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. त्यासाठी त्यांनी विनंती केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची विनंती अधिकाऱ्यांकडून मान्य करण्यात आली आहे.
त्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा ईडीला पत्र पाठवून शुक्रवारी ईडी चौकशीपासून सुटका मिळावी यासाठी त्यांनी पत्रही पाठवलं आहे. ही विनंती करताना त्यांनी आपल्या आईचे कारण देत त्यांनी सोनिया गांधी यांच्या उपचाराचे कारण देऊन शुक्रवारी चौकशीसाठी आपल्याला हजर राहता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे मनी लाँड्रिंग प्रकरणात 17 जून ते 20 जूनपर्यंत होणारी चौकशी पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती राहुल गांधी यांनी केली होती. त्यामुळे ही विनंतीला मान्य केल्याने आता 17 जून ते 20 जूनपर्यंत ही चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे.
खासदार राहुल गांधी यांनी पाठवलेल्या पत्राद्वारे ईडी अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्बेत सध्या चांगली नाही. त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीला आपल्याला शुक्रवारी हजर राहता येणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्यासाठी ते हजर राहणार नसल्याने त्यांनी त्यासाठी सवलत मागितली होती.
राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयात त्यांच्याबरोबर राहण्याची गरज असल्याचे कारण राहुल यांनी ईडीला दिले आहे. अधिकाऱ्यांनीही ते मान्य केले असून त्यांची मागणी मान्य केली आहे.