राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्र सरकारवर तुटून पडले. त्यांनी 90 मिनिटांच्या भाषणात संसद दणाणून सोडली. सत्ताधारी पक्षातील अनेक बड्या नेत्यांना वेळोवेळी उभे राहून त्यांच्या अनेक मुद्यांवर आक्षेप नोंदवावा लागला. त्यांच्या भाषणा दरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणातील काही शब्द कार्यवाहीतून वगळण्यात आले. कोणते आहेत ते शब्द?
या शब्दांना लावली कात्री
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आक्रमक भाषणाने लोकसभेचे स्वरुप बदलून गेले. अनेक मुद्यांवर राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणावर आसूड ओढले. 90 मिनिटांच्या भाषणात त्यांनी हिंदू, अग्निवीरसह 20 मुद्यांवर लोकसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. लोकसभेतील त्यांच्या भाषणातील काही शब्द संसदीय कार्यवाहीतून बाजूला करण्यात आले. त्यात उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी, कोटातील परीक्षा आणि श्रीमंतांना फायदा पोहचविण्यासाठीच्या वक्तव्यांचा समावेश आहे.
लोकसभा चर्चेदरम्यान राहुल गांधी यांच्या इतर वक्तव्यांना पण कात्री लावण्यात आली. भाजप अल्पसंख्यांक समाजासोबत अनुचित व्यवहार करत असल्याचे वक्तव्य काढण्यात आले. तर अग्निवीर ही सैन्य दलाची नाहीतर पीएमओची योजना आहे. स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसा करतात, अशी त्यांची वक्तव्ये रेकॉर्डवरुन हटविण्यात आली.
देवांचे फोटो लोकसभेत
राहुल गांधी सरकारला घेरण्यासाठी भगवान शंकर, गुरुनानक देव आणि जीसस क्राईस्ट यांचे छायाचित्र घेऊन संसदेत आले. भगवान शंकराचा फोटो दाखवत ते कधी भय दाखवत नाहीत, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांनी 20 मुद्यांवर सरकारला घेरले. यामध्ये हिंदू, अग्निवीर, शेतकरी, मणिपूर, NEET परीक्षा, बेरोजगारी, नोटबंदी, GST, MSP, हिंसा, भय, धर्म, अयोध्या, गुजरात, जम्मू-कश्मीर, लडाख, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष या मुद्यांवर त्यांनी आक्रमक शैलीत बाजू मांडली.
पंतप्रधान आणि गृहमंत्री नाराज
राहुल गांधी यांच्या तुफान भाषणावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदू वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान जागेवरुन उभे राहिले आणि त्यांनी तीव्र हरकत नोंदवली. हिंदू समाजाला हिंसक म्हणणे चुकीचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे वक्तव्य कोट्यवधि हिंदूचा अपमान करणार असल्याचे मत अमित शाह यांनी व्यक्त केले. हिंसेला एखाद्या धर्माशी जोडणे हे चुकीचे असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.