पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन, सत्ताधारी विरोधकांकडून श्रद्धांजली…

| Updated on: Dec 30, 2022 | 10:55 AM

"हीरा बा यांच्या निधनाने अतिव दु:ख झालं, मोदी कुटुंबाला या दुख:तून सावरण्याचं बळ मिळो",हिराबेन यांना श्रद्धांजली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन, सत्ताधारी विरोधकांकडून श्रद्धांजली...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आई हीराबेन मोदी यांच्या समवेत...
Follow us on

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं निधन (PM Narendra Modi Mother Hiraben Modi Passed Away) झालं.वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या (Hiraben Modi) जाण्यावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हीराबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आई आणि मुलाचं प्रेम अनमोल असतं. हिराबेन यांच्या निधनाच्या बातमीने अतिव दुःख झालं. मोदीजी, या कठीण काळात माझं प्रेम आणि समर्थन तुमच्यासोबत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदीजी, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं. कधीही भरून न निघणारी ही हानी आहे. माझ्या सहवेदना आपल्यासोबत आहेत. हीरा बा यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, हीच प्रार्थना, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

हीराबेन यांच्या निधनाने दु:ख झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही.आई जाण्याचे दुःख मोठे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबीयावर आघात झाला आहे.ईश्वर मातोश्री हीराबेन यांच्या आत्म्यास शांती देवो. मोदी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.