नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने काढलेल्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच भारत जोडो यात्रेतून आता राहुल गांधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी संसदेत पोहचले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भारत जोडोच्या घोषणाही देण्यात आल्या. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच बुधवारी सर्व पक्षांचे नेते संसदेत पोहोचले होते. त्या नेत्यांमध्ये राहुल गांधी यांचाही समावेश होता. जानेवारीच्या अखेरीस काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रा संपवून राहुल गांधी आज संसदेत पोहोचले होते. यावेळी ते प्रचंड आनंदी आणि उत्साही दिसत होते.
भारत जोडो यात्रेतून खासदार राहुल गांधी थेट संसदेत पोहचल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांची दाढी आणि केस वाढलेले दिसत आहेत.
“जोड़ो-जोड़ो, भारत जोड़ो” ✊️
आज इन नारों के साथ संसद में राहुल गांधी जी का स्वागत हुआ। pic.twitter.com/XYmoFfMC04
— Congress (@INCIndia) February 1, 2023
तर राहुल गांधी पांढरा टी-शर्ट आणि काळी पँट घालून संसदेत पोहोचले आहेत. त्या व्हिडीओमध्ये ते आपल्या सहकारी खासदार यांना गुड मॉर्निंग म्हणत आहेत.
तर त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी संसद भवनाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करत भारत जोडोचा नारा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा त्यांची दाढी अगदीच लहान होती. आणि केसही जास्त लांब नव्हते. मात्र यात्रा संपल्यानंतर त्यांच्या दिसण्यामध्ये आता मोठा बदल झाला आहे. सध्या राहुल गांधी यांची दाढी वाढली आहे.
प्रवासादरम्यान त्यानी वाढवलेल्या दाढीसाठी त्यांची तुलना इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन, जर्मन तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स आणि फॉरेस्ट गंप नायक यांच्याबरोबर केली गेली आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केल्यानंतर आणि ती समाप्त झाल्यानंतर आता राहुल गांधी यांची पप्पू ही सोशल मीडियावर जी प्रतिमा होती, त्यातून ते बाहेर आले का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
भारत जोडो यात्रेचा कन्याकुमारी येथून सुरू झालेला प्रवास सोमवारी काश्मीरमध्ये संपला आणि हा प्रवास 145 दिवस चालला होता. तर या भारत जोडो यात्रे प्रवासादरम्यान 4 हजार किलोमीटरचे अंतर कापले गेले आहे.
जाहिरात क्षेत्रातील दिग्गज प्रल्हाद कक्कर यांनी राहुल गांधी यांच्या दाढीच्या लूकविषयी बोलताना सांगितले की, त्यांनी काही प्रमाणात गांभीर्य दाखवले आहे.
एक गंभीर व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. तर ते आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू आणि राजीव गांधी यांचे पुत्र राहिलेले नाहीत. ते आता राहुल गांधी आहेत.
हा एक मोठा बदल आहे. जो लोक स्वीकारत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. माजी काँग्रेस अध्यक्षांचा नवीन दाढीवाला लूक हा संदेश देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असू शकतो, असेही काही विश्लेषकांचे मत आहे.