रेल्वेची टक्कर विरोधी यंत्रणा कुचकामी ? ओदिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

| Updated on: Jun 03, 2023 | 2:31 PM

ओदिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेची टक्कर विरोधी यंत्रणा 'सुरक्षा कवच' यंत्रणा कुठे गेली ? 'वंदेभारत' मध्येच केवळ माणसं प्रवास करतात का? असा सवाल विरोधकांनी केला आहे.

रेल्वेची टक्कर विरोधी यंत्रणा कुचकामी ? ओदिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
ODISHA TRAIN ACCIDENT
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यात शालीमार – चेन्नई कोरोमंडळ एक्स्प्रेस, बंगळुरु- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन गाड्यांची टक्कर होऊन शुक्रवारी झालेल्या भीषण ( Odisha Train Accident ) अपघातात 280 लोकांचा मृत्यू तर 900 हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी रेल्वेच्या ‘सुरक्षा कवच’ ( Kavach ) टक्कर विरोधी यंत्रणेवर प्रश्न निर्माण केला आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणात रेल्वे मंत्र्यांच्या ( Railway Minister Ashwini Vaishnaw ) राजीनाम्याची मागणी केली आहे.

ओदिशातील भयंकर अपघाताने प्रत्येकाला विचलित केले आहे. बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्टेशन जवळ तीन ट्रेनची टक्कर होऊन मृत्यूचा आकडा 280 पर्यंत पोहचला आहे. तर 900 जणांहून अधिक जखमी झाले आहेत. आता युथ कॉंग्रेसचे अध्यक्ष बी. श्रीनिवास यांनी सरकारवर टीकास्र सोडले आहे. बी. श्रीनिवास यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा रेल्वेच्या टक्कर विरोधी यंत्रणेची माहीती सांगतानाचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. यावर जेव्हा एक ट्रेन घसरून दुसऱ्या ट्रॅकवर आली तेव्हा ‘सुरक्षा कवच’ यंत्रणा काय करीत होती ? तीनशेच्या आसपास मृत्यू आणि एक हजार लोक जखमी झाले असताना यास जबाबदार कोण असा सवाल बी. श्रीनिवास यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केला आहे.

रेल्वेची ‘कवच’ यंत्रणा का रोखू शकली नाही अपघात ?

रेल्वेची सुरक्षा यंत्रणा ट्रेनला लाल सिग्नल पार करण्यापासून वाचविण्यासाठी आणि टक्कर रोखण्यासाठी तयार केली आहे. जर काही कारणानी लोको पायलट ट्रेन कंट्रोल करण्यात अयशस्वी झाला, तर ही यंत्रणा ट्रेनची ब्रेकींग सिस्टीम ऑटोमेटीक एक्टीव करतो. या शिवाय कवच यंत्रणा दोन ट्रेनची टक्कर टाळण्यासाठी देखील सक्षम आहे. म्हणजेच एकाच रुळांवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या तरी अपघात होणार नाही. बालासोरमध्ये झालेल्या अपघातानंतर या मार्गावर ही यंत्रणा कार्यरत नव्हती असे समजते.

विरोधी पक्षांची टीका

राष्ट्रीय जनता दलाने ( RJD ) ट्वीटरवर लिहीले आहे की, कवच मध्ये सुद्धा घोटाळा झाला का ? मोदींच्या दृष्टीने केवळ वंदेभारतमध्ये माणसं प्रवास करतात. रेल्वे मंत्र्यांकडे नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी इतकी कुटुंबे बरबाद झाल्याने राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.
तेलंगणाचे आयटी मंत्री आणि बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर यांनी ही रेल्वेच्या सुरक्षा कवच वर प्रश्न निर्माण केले आहेत. केटीआरनी केंद्राला सवाल केला आहे की टक्कर विरोधी यंत्रणेचे काय झाले ?

शिवसेना उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी रेल्वे मंत्री स्वत: ओदिशाचे असल्याने त्यांनी नैतिक आधारावर राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे. बसपाच्या प्रमुख मायावती तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ओदिशा रेल्वे अपघातातील मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असे म्हटले आहे.