मुंबई : भारतीय रेल्वेने ( Indain Railway ) प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी नियमात बदल केले आहेत. रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतात आता मोठ्या शहरांना जोडण्यासाठी सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेसचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. आता रेल्वेने आपल्या लांबपल्ल्यांच्या मेल- एक्सप्रेस ( Mail-Express ) गाड्यांवर पूर्वी प्रमाणे आरक्षण चार्ट ( resevation chart ) चिकटविण्याचे प्रकार देखील बंद केला आहे, काय आहे या मागचे नेमके कारण जाणून घेऊया …
रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करताना लोकांना तिकीटांचे आरक्षण करावे लागते. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत असते. ट्रेन सुटण्यापूर्वी ट्रेनच्या डब्याबाहेर आरक्षण तक्ता चिकटवलेला असतो. यात प्रवाशांच्या कन्फर्म तिकीटांचा विवरण दिलेले असते. चार्टमध्ये प्रवाशाचे नाव, वय आणि आसन क्रमांक दिलेला असतो. ट्रेनच्या दरवाजाजवळ ही माहीती चिकटवली जात असते. प्रवासी आपला आसनाचा क्रमांक पाहून ट्रेनमध्ये चढत असतात. आता हा चार्ट इतिहास जमा झाला आहे.
रेल्वेने चार्टची चिकटविण्याची प्रथा सुरूवातीला साल 2018 मध्ये सहा महिन्यासाठी बंद केली होती. त्यानंतर ही प्रथा संपूर्णपणे बंद झाली. साल 2019 पासून रेल्वेने रिझर्वेशन चार्ट ऑनलाईन पहाण्याची सोय सुरु केली. त्यामुळे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर ट्रेनच्या डब्यांची आणि बर्थची स्थिती समजते. म्हणजे रिझर्व्हेशन चार्ट ऑनलाईन समजतो. रेल्वेने म्हटले आहे की ट्रेनचा प्रवास सुरू होणाऱ्या स्थानकापासून मध्ये येणाऱ्या स्थानकापर्यंत रिकाम्या बर्थची संपूर्ण माहीती मोबाईल आणि वेबसाईटवर उपलब्ध होते.
या शिवाय रेल्वेने आता पेपरलेस कारभार करण्यासाठी पेपर चार्ट लावण्याऐवजी रेल्वे स्थानकांवर डीजिटल स्क्रीन लावल्या आहेत. त्यावर आता रिझर्व्हेशन चार्ट प्रसिद्ध केला जात आहे. पेपरचा चार्ट बंद केल्याने रेल्वेच्या वार्षिक 28 टन कागदाची बचत झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान कमी झाले आहे. ऑनलाईन रिझर्व्हेशन चार्टची सुविधा आता रेल्वेच्या सर्व गाड्यांना उपलब्ध झाली आहे.