येणार येणार म्हणून गेले काही महिने चर्चेत असलेल्या वंदेभारत एक्सप्रेसच्या स्लिपर कोच आवृत्तीचे डिटेल्स आज अखेर बाहेर आले. या वंदेभारत स्लिपर कोचची निर्मिती BEML कंपनीने केली आहे.ही वंदेभारत स्टेनलेस स्टीलच्या बांधणीची असून अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या नव्या वंदेभारतमध्ये क्रॅश बफर आणि कपलर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे.
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात आलेली वंदेभारत एक्सप्रेस अल्पावधीतच लोकप्रिय झाली असून तिने कमी खर्चात बुलेट ट्रेनला पर्याय केला आहे. या सेमी हायस्पीड वंदेभारतमुळे प्रवासाच्या वेळत मोठी बचत होत आहे. या वंदेभारतचा आता स्लिपर कोच आवृत्ती आली आहे. या नव्या स्लिपर कोच वंदेभारतमुळे प्रवाशांना आता लांबच्या प्रवासात आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे.या वंदेभारत स्लिपर कोचमध्ये फायर सेफ्टी स्टॅंडर्ड वापरण्यात आले आहे.हा नवा स्लिपर कोच देखील 16 डब्यांचा असून 11 एसी थ्री टीयर कोच, चार एसी टु टियर कोच आणि एक एसी फर्स्ट क्लासचा कोच आहे.
या नव्या एसी वंदेभारत स्लिपर कोच ट्रेनमधील 11 एसी थ्री टियर कोचमध्ये 611 बर्थ असणार आहेत. चार एसी टु टियर कोचेसमध्ये 188 बर्थ असणार आहेत. एसी फर्स्ट क्लास कोचमध्ये 24 बर्थ असणार आहेत. नव्या स्लिपर कोच वंदेभारतमध्ये नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. फ्रंट नोज पासून ते इंटेरिअर पॅनल, सिट्स, स्लिपर बर्थ आणि इतर सर्व बाबी चेअर कार वंदेभारत पेक्षा आधुनिक आहेत. BEML ने इलेक्ट्रिकल पार्ट्स, प्रोपल्शन तंत्रज्ञान, बोगी, बाह्य प्लग दरवाजे, ब्रेक सिस्टीम आणि HVAC यांच्या समावेश केला आहे, ही ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी तयार केली आहे.
वंदेभारत स्लिपर कोचमध्ये USB चार्जिंग सुविधेसह इंटीग्रेटेड रिडींग लाईट्स, पब्लिक अनाऊन्समेंट, व्युजव्हल इन्फॉर्मेशन सिस्टीम, डिस्प्ले पॅनल आणि सिक्युरिटी कॅमेरे, मॉड्युलर पॅण्ट्री आणि दिव्यांगासाठी स्पेशल बर्थ आणि टॉयलेट्स देखील उपलब्ध केले आहेत.वंदेभारत स्लिपरच्या फर्स्ट क्लास एसी कारमध्ये प्रवाशांच्या सुविधा वाढविल्या असून आलिशान बाथरुममध्ये प्रवाशांना गरम पाण्याने शॉवर देखील घेता येणार आहे.