मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : भारतीय रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी स्वस्तात प्रवास करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. सणासुदीत किंवा सुट्या हंगामामुळे त्यामुळे रेल्वेला प्रचंड गर्दी होत असते, त्यामुळे अनेक प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पकडते. परंतू आता प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी रेल्वेने एक मोठी योजना आखली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानूसार येत्या चार ते पाच वर्षांत रेल्वे 3000 अतिरिक्त ट्रेन चालविण्याच्या विचारात आहे. त्यामुळे वाढत्या प्रवाशांना सहजपणे तिकीटे मिळणे शक्य होणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की आता रेल्वेने दरवर्षी सुमारे 800 कोटी प्रवासी प्रवास करीत आहेत. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे येत्या चार-पाच वर्षांत आम्हाला 1000 कोटी प्रवाशांच्या क्षमतेनूसार वाढ करावी लागणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की यासाठी रेल्वेला 3000 अतिरिक्त ट्रेनची गरज आहे. वाढती प्रवासी संख्या पाहून येत्या भविष्यात एवढ्या अतिरिक्त ट्रेन चालविण्याची रेल्वेची योजना आहे.
सध्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यात 69,000 नवीन कोच उपलब्ध आहेत. त्यामुळे रेल्वेच्या उप कंपन्या दरवर्षी 5000 नवीन कोचची निर्मिती करीत आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानूसार रेल्वे दरवर्षी 200 ते 250 नवीन ट्रेन सुरु करू शकते. याशिवाय 400 ते 450 वंदेभारत ट्रेन येत्या वर्षांत रेल्वेच्या ताफ्यात सामिल करण्याची योजना आहे. रेल्वे मंत्रालय ट्रेनचा वेगात वाढ करणे तसेच रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याचे काम करीत असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
भारतीय रेल्वे लांबपल्ल्याच्या ट्रेनचा वेग वाढविण्याचे काम सुरु आहे. रेल्वेची गती कमी करणाऱ्या कारणांचा शोध घेऊन ती कारणे दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कारण थांब्या शिवाय इतर कारणांनी देखील मार्गांवर ट्रेनच्या वेगांवर लावलेल्या निर्बंधामुळे ट्रेनला कमी वेगात चालवावे लागत असते. गाड्यांच्या वेगावर बंधन टाकणाऱ्या सर्व बाबींवर उपाय शोधण्याचे काम सुरु असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. जर राजधानी एक्सप्रेसचा दिल्ली ते कोलकाता मार्गाचा विचार केला तर वळणदार मार्ग, स्थानके, वेगावरील निर्बंध दूर केले तर सध्याच्या वेळे पेक्षा दोन तास 20 मिनिटे वाचू शकतात असेही त्यांनी सांगितले.
सणासुदीत यावर्षी स्पेशल ट्रेनची संख्या तीन पट वाढविली आहे. गर्दी कमी करण्यासाठी 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 6,754 स्पेशल ट्रेन चालविण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी ही संख्या 2,614 इतकी होती.