नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे आता AI तंत्राचा अवलंब करणार आहे. जर ट्रेन चालवताना ट्रेनच्या ड्रायव्हरला डुलकी लागली तर त्याला अलर्ट करणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटीयर रेल्वे ( NFR ) एक आर्टीफिशियल इंटेलिजन्स ( AI ) आधारित डीव्हाईस तयार करीत आहे. हे डीव्हाईस ड्रायव्हरवर लक्ष ठेवणार असून त्याला जर झोप येत असेल तर लागलीच अलर्ट करणार आहे. जर ड्रायवरचे नियंत्रण गमावले तर इमर्जन्सी ब्रेक लागण्याची तरतूद यात आहे. या डीव्हाइसचे नाव रेल्वे ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम ( RDAS ) असे ठेवण्यात आले आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार सध्या एआय आधारित यंत्रणा विकसित करण्याचे काम वेगाने सुरु आहे. ही यंत्रणा योग्य पद्धतीने काम करीत असल्याचे चाचण्यांमध्ये स्पष्ट झाले आहे. काहीच आठवड्यात ही यंत्रणा रेल्वेत बसविण्यात येणार आहे. 2 ऑगस्ट रोजी रेल्वे बोर्डाने नॉर्थ ईस्ट फ्रंटीयर रेल्वे ( NFR ) एक पत्र लिहीले होते. त्यात रेल्वे ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम ( RDAS ) तयार करण्याचे सुतोवाच केले होते.
एआय आधारित यंत्रणा सर्वात आधी पायलट प्रोजेक्ट नूसार 20 मालगाड्या ( WAG9) आणि पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनात ( WAP7 ) बसविण्यात येणार आहे. सर्व झोनला हे डीव्हाईस बसविल्यानंतर यासंदर्भात फिडबॅक देण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्या सुधारणा करता येईल असे सूत्रांनी म्हटले आहे.
इंडीयन रेल्वे लोको रनिंगमॅन ऑर्गनायझेशनने ( IRLRO ) या डीव्हाईसचा उपयोगासंदर्भात माहिती दिली आहे. सर्व फास्ट ट्रेनच्या ड्रायव्हरना अलर्ट करण्यासाठी ही यंत्रणा लागू होणार आहे. IRLRO चे वर्कींग प्रेसिडेंट संजय पांधी यांनी सांगितले की हायस्पीड ट्रेनमध्ये पायाने चालविता येणारा एक लिव्हर ( पॅडल ) असतो. ज्यास दर एक मिनिटाने दाबावे लागते. जर तो दाबला गेला नाही तर आपोआप इमर्जन्सी ब्रेक लागतो आणि ट्रेन जागच्या जागी थांबते. ही यंत्रणा ड्रायव्हर सतर्क आहे हे ओळखण्यासाठी याआधीच आहे.
नवीन एआय आधारित ( RDAS ) यंत्रणेचे स्वागत आहे. परंतू जर सरकार रेल्वे सेफ्टी संदर्भात खरोखरच गंभीर असेल तर अन्य उपायांपेक्षा ड्रायव्हरचा थकवा, त्यांचे रनिंग अवर्स, सुविधा आणि आरामाचे तास यावर विचार करायला हवा असे म्हटले आहे. अनेक ड्रायव्हरना 11 तासाच्या ड्यूटीत जेवण आणि टॉयलेट जाण्यासाठी ब्रेक मिळत नाही. जर हे सर्व उपाय केले जर अलर्ट सिस्टीमची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.