अयोध्या : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंचा (raj thackeray) अयोध्या दौरा (Ayodhya Visit) गाजत आहे. आता तर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा दिल्लीतही होऊ लागली आहे. कारण राज्यात राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन देणाऱ्या भाजपच्याच एक उत्तर प्रदेशातील नेत्याने राज ठाकरेंच्या या दौऱ्याला कडाडून विरोध केला. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan singh) यांनी घेतली. आज त्यांनी अयोध्येत भव्य रॅली काढत या दौऱ्याला थेट आव्हान दिलंय. आजच्या रॅलीत त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शनही केलं आहे. मात्र भाजपकडून यांची मनधरणी सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यासाठी सोमवारी केंद्रातील भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांना फोन करत होते. मात्र ते फोन घेत नाहीत, अशा चर्चाही रंगल्या. मात्र आज भाजपचे नेते शाहनवाज हुसैन हे बृजभूषण सिंह यांच्या भेटीला पोहोचल्याने या चर्चा आणखी बळावल्या. या भेटीनंतर हुसैन यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.
बृजभूषण सिंह यांच्या भेटीबाबत शाहनवाज हुसैन यांना विचारले असता ते म्हणाले, बृजभूषण सिंह माझे मित्र आहेत, मोठे भाऊ आहेत, मी माझ्या कामासाठी इकडे आलो होतो, त्यामुळे त्यांना भेटायला आलो आहे. तसेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत मी तुमच्याकडूनच हे ऐकतोय, मला याविषयीची काहीच माहिती नाहीये. मला आताच या विषयाची माहिती मिळतेय, याबाबत मी बृजभूषण सिंह यांच्याशी बातचीत करणार आहे. मी बिहारहून थेट बृजभूषण सिंह यांना भेटायला आलोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे या भेटीनंतर तरी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध मावळणार की नाही? असा सवालही राजकारणात विचारण्यात येत आहे.
यूपीनंतर आता मुंबईतही उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरेंना विरोध केला आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना, राज ठाकरेंनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच आपण अयोध्येला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. सुनील शुक्ला यांनी या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पत्र लिहून आपला निषेध व्यक्त केला असून, उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. उद्या राज ठाकरेंच्या घरी जाऊन उत्तर भारतीयांची माफी मागण्याचे निवेदन देणार असल्याचे पंडित सुनील शुक्ला यांनी सांगितले आहे, त्यामुळे आता या दौऱ्यावरून पुन्हा राजकारणात ठिणग्या उडू लागल्या आहेत.